News Flash

सांगलीत अत्यावश्यक कारणे सांगत रस्त्यावर गर्दी

पहिल्या दिवशी संचारबंदीची केवळ औपचारिकता

मिरज बस स्थानकामध्ये मोफत शिवभोजन थाळी घेत असताना तरुणी.

पहिल्या दिवशी संचारबंदीची केवळ औपचारिकता

सांगली : भाजी किराणा व औषध खरेदी आणि बँकेतील कामाच्या निमित्ताने माणसांची वर्दळ कायम राहिल्याने पहिल्याच दिवशी सांगली, मिरजेत संचारबंदीची केवळ औपचारिकताच पाहण्यास मिळाली. लोकांनी गर्दी टाळावी यासाठी पोलीस रस्त्यावर असूनही कोणीही विचारणा करीत नसल्याने अनावश्यक गर्दी टाळण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

रात्री आठपासून संचारबंदीसह कठोर निर्बंधांची अंमलबजावणी झाली असली, तरी शहरातील अत्यावश्यक सेवा म्हणून रिक्षा वाहतूक, किराणा दुकाने, बेकरी, भाजी विक्री सुरूच होती. तसेच अत्यावश्यक कामासाठी ये-जा करण्यासाठी परवान्याची गरज नसल्याने अनेक लोक रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले.

लोकांनी अकारण घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली असली, तरी फारशी विचारणा करण्यात येत नसल्याने अनेक जण अकारण किरकोळ कारण सांगून बाहेर पडत होते.

मुख्य रस्त्यावरील अनेक दुकाने बंद असली, तरी लोक भाजीसह जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या निमित्ताने रस्त्यावर येत होते.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त अधीक्षक मनीषा डुबुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही लोकांना अकारण घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन करीत होते.

तर रस्त्यावरील भाजी विक्री पूर्णपणे थांबली असली, तरी अनेक विक्रेते ठरावीक ठिकाणी थांबून भाजी विक्री करीत होते. मात्र पानठेले, चहा विक्रीचे गाडे, नाश्ता सेंटर बंद राहिल्याने गर्दीला अल्पसा आळा बसला आहे.

शहरी बस वाहतूक बंद असली, तरी लांब पल्ल्याची बस वाहतूक नित्याप्रमाणे सुरू होती. शिवभोजन केंद्रावर विना मोबदला शिवथाळी पार्सल रूपात देण्यात येत होती. प्रत्येक केंद्राला १५०० शिवथाळी मोफत देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:50 am

Web Title: crowds on the streets telling essential reasons in sangli zws 70
Next Stories
1 सोलापुरात अवकाळी पावसामुळे शेतीची हानी
2 व्हेंटिलेटर हाताळणीसाठी पात्र मनुष्यबळाअभावी तडजोडीची आपत्ती
3 करोना रुग्णांसाठी कलिंगडातून गुटखा, पार्सलमधून दारू
Just Now!
X