जालन्यातील पोलाद उद्योगातील प्राणवायू प्रकल्प बघण्यासाठी गर्दी

जालना : एरव्ही प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या येथील औद्योगिक वसाहतीमधील बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळया उत्पादित करणाऱ्या ‘पोलाद’ उद्योगात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांची वर्दळ वाढली आहे. त्याला कारण आहे या उद्योगाने उभारलेल्या हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रकल्प!

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने लोखंडी सळया तयार करणाऱ्या उद्योगातील द्रवरुप प्राणवायूू प्रकल्प आणि बाहेरून मोठय़ा क्षमतेचे प्राणवायू सिलिंडर आणण्यावर र्निबध आले. लोखंडी सळया तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या प्राणवायूवर र्निबध आल्याने उत्पादनावरही परिणाम झाला. त्यानंतर उद्योगांचे नुकसान होऊ नये आणि करोना रुग्णांनाही प्राणवायू उपलब्ध व्हावा या दृष्टीने हवेतून प्राणवायू घेण्याचे नवीन प्रकल्प उभारण्याचा विचार समोर आला.

पोलादचे संचालक नितीन काबरा यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मार्ग निघाल्यावर पावणे दोन कोटीचा हवेतून प्राणवायू घेण्याचा प्रकल्प आम्ही अठरा दिवसांत उभा केला. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून आम्ही दररोज तयार होणाऱ्या तीनशे सिलिंडरपैकी अडीचशे सिलिंडर शासकीय रुग्णालयांना विनामूल्य देत आहोत.

या उद्योगाचे प्रमुख संचालक सतीश अग्रवाल हे जिल्ह्य़ातील राजकीय, शासकीय, व्यापार-उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळखदेख असलेले व्यक्तिमत्त्व! त्यामुळे करोना रुग्णांसाठी विनामूल्य प्राणवायू पुरवठा करीत असल्यामुळे त्यांचा सत्कार आणि प्रकल्पास भेट देणारांची त्यांच्या उद्योगात वर्दळ वाढली. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्याचप्रमाणे कैलास गोरंटय़ाल, बबन लोणीकर, नारायण कुचे इत्यादी आमदारांनी या प्राणवायू प्रकल्पास भेट दिली. माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पास भेट दिली. याशिवाय व्यापारी महासंघ, मारवाडी संमेलन, लायन्स क्लब, दंतवैद्यक संघटना, यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समूहाने जाऊन अग्रवाल यांचा सत्कार केला. छायाचित्रे काढली. साहजिकच छायाचित्र काढताना काहींना मुखपट्टी काढण्याचा मोह आवरला नाही आणि करोनाकाळात शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचाही विसर पडला.

व्यापार-उद्योग क्षेत्रातील एका समूहाने जाहीररित्या अग्रवाल यांना ‘ऑक्सिजन मॅन’ हा किताब बहाल केला. सामाजिक कार्याबद्दल लवकरच अग्रवाल यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणाही झाली.

प्रकल्पाची तयारी

पोलादमधील प्रकल्पातून दररोज दोनशेपेक्षा अधिक सिलिंडरचे विनामूल्य वितरण सध्या जिल्ह्य़ात आणि जिल्ह्य़ाबाहेर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार होत आहे. जालना येथील चार उद्योगात सध्या असे आणखी चार प्राणवायू प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. याशिवाय येथे प्राणवायूचा एक खासगी प्रकल्पही उभारण्यात येत आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या येथील दोन खासगी प्रकल्पातील संपूर्ण प्राणवायू करोना रुग्ण आणि वैद्यकीय कारणासाठी वापरण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात दोन प्राणवायू प्रकल्प वर्षभरापूर्वी उभारण्यात आले असून आणखी एका प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय, राजूर, अंबड, घनसावंगी येथील शासकीय रुग्णालयातही असे प्रकल्प उभे राहत आहेत. जिल्ह्य़ात अन्यत्र हवेतून प्राणवायू घेणारे बारा पीएसए प्रकल्पही उभारले जात आहेत.

– रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी