नागपूरला हलविले, प्रकृती स्थिर
एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील मौजा रेकनारच्या जंगलात नक्षलवादी व पोलिस दलात रविवारी पहाटे झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचा जवान मुलचंद जखमी झाला असून त्याला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मौजा रेकनार जंगल परिसरात पोलिस मदत केंद्र हेडरी जिल्हा पोलिस पथक व केंद्रीय राखीव दल संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना रविवारी पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्यावर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचा जवान मुलचंद जखमी झाला असून त्याला तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यावर तेथून नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. नक्षलवाद्यांची गोळी मुलचंदच्या गालाला चाटून गेल्याने तो जखमी झाला. सध्या त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती गडचिरोली पोलिस दलाने दिली. तसेच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत काही नक्षलवादीही जखमी झाले असून त्यांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात असण्याची शक्यता पोलिस दलाने वर्तविली आहे. चकमकीनंतर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

मुलचंद नागपूरच्या ‘केअर’ रुग्णालयात
जरम्यान, जखमी जवान मुलचंदला रविवारी उपचाराकरिता नागपूरच्या ‘केअर’ या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला प्रथम अतिदक्षता विभागात व त्यानंतर सामान्य वार्डात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मूलचंद दोंडारे (३५, रा. गडचिरोली) असे जखमी जवानाचे नाव आहे. मूलचंद हा ‘सीआरपीएफ’च्या डी-१९१ या बटालियनचा जवान आहे. त्याला रविवारी गडचिरोलीत प्राथमिक उपचार करून नागपूरच्या केअर रुग्णालयात दुपारी दीडच्या सुमारास दाखल करण्यात आले. प्रथम त्याला अतिदक्षता विभागात ठेवून विविध तपासण्या केल्यावर त्याला सामान्य वार्डात हलवण्यात आले. मूलचंदच्या गालावर टाके लावून त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.