वर्धा : पतंग हा कीटक दुर्लक्षित असला तरी त्याचे रेशीम उद्योगामुळे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होते. आणि त्याच रेशीम उद्योगामुळे अर्थशास्त्रीय योगदान लक्षणीय असल्याने ‘पतंगा’ला जपले पाहिजे, असे मत पतंग सप्ताहानिमित्त आयोजित वेब संवादात व्यक्त झाले.

जगभरात गत ९ वर्षांपासून जुलै महिन्यात पतंग सप्ताह साजरा करण्यात येतो. पतंगाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा, या हेतूने बहार नेचर फोऊंडेशनतर्फे  विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

उपक्रमात ‘पतंगाची ओळख आणि अर्थशास्त्रीय महत्त्व’ या विषयावर कीटकतज्ज्ञ व रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.के. सोनटक्के यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले की फु लपाखरासमान दिसणारा पतंग हा कीटक दुर्लक्षित आहे. पतंग आणि फुलपाखरे हे एकमेकांच्या जवळचे असून संधीपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी प्रवर्गात पतंगाचा समावेश होतो. महाराष्ट्रात पतंगाची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत जास्त आहे. बहुतांश पतंग निशाचर असून काव्यात दिव्यांवर झेप घेणारा प्रियकर कीटक अशी त्याची ओळख आहे. पतंगाशिवाय इतरही काही कीटक दिव्याभोवती घिरटय़ा घालतात. पतंगाच्या काही जाती या दिनचरही आहेत. रेशीम तयार करणाऱ्या पतंगाच्या चार प्रजाती आहे. त्या माध्यमातून रेशीम उद्योग वाढत चालला आहे. रेशीम उत्पादनामुळे आर्थिक तिजोरीत भरच पडते, अशी माहिती डॉ. सोनटक्के यांनी दिली. पतंगाचे विविध प्रकार, अधिवास, प्रमुख अवस्था, पर्यावरणातील महत्त्व आदी पैलूंवर त्यांनी सचित्र मार्गदर्शन केले.

जगात पतंगाच्या १ लाख ६० हजार जाती आहेत. त्या एकूण २६ कुळात विभागलेल्या आहे. भारतात त्यापैकी १२ हजार जाती आढळतात, अशी माहिती संस्थेचे सचिव वैभव देशमुख यांनी दिली. बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. वक्त्यांचा परिचय डॉ. आरती प्रांजळे भुसे यांनी दिला. संवाद संचालन दर्शन दुधाने व आभार दीपक गुढेकर यांनी मानले. उपक्रम आयोजनात मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, प्रा. किशोर वानखेडे, राजदीप राठोड, स्नेहल कुबडे, अविनाश भोळे, अविनाश मुनेश्वर आदींचे योगदान लाभले. या वेब संवादात विविध जिल्हय़ातून निसर्ग अभ्यासकांनी हजेरी लावली.