करोना काळात प्रशासन अनभिज्ञ, कारवाई होत नसल्याने भाजीपाला माफिया पुन्हा सक्रिय

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार :  हिवाळ्यात भाजीपाल्याचे भरघोष पीक घेण्यासाठी  माफिया वसई विरार मध्ये सक्रिय झाले आहेत. करोना काळात प्रशासनाकडून कारवाई बंद झाल्याने शहरालगतच्या परिसरात पुन्हा गटाराच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून शहरात शेकडो एकर जमिनीवर गटारातील पाण्यावर भाजीपाल्याचे मळे पिकवले जात आहेत.

विरार पूर्वेच्या फुलपाडा, जीवदानी पाडा, ९० फुटी रस्ता, मनवेल पाडा, चंदनसार या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गटाराच्या पाण्यावर भाजीपाल्याची शेती केली जात आहे. पण एवढय़ा मोठय़ा परिसरात केली जाणारी ही भाजीपाल्याची शेतीया बाबत महानगरपालिका अथवा अन्न आणि औषध प्रशासन यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. आज तयागत या भाजीमाफियांवर कोणतीही कारवाई करणायत आली नाही आहे.

सध्या गटाराच्या पाण्यावर शेकडो एकर शेतीत भाजीपाल्याचे पिक  घेण्याचे प्रकार सरार्स सुरु आहेत. मागील काही दिवसापासून सातत्याने या प्रकारच्या बातम्या होत असल्याने या भाजीमाफियांनी शेताला कापडाचे कुंपण घातले आहे. तसेच गटारातून पाणी घेण्यासाठी असलेल्या पाईप जमिनीत पुरून ठेवला जातो आणि पंप काम झाल्यानंतर लपवून ठेवले जाते.  अशा पद्धतीने घाणीच्या पाण्यावर भाजीपाला पिकवून बाजारात विक्रीला आणला जातो. कमालीच्या घाणीच्या, दुषित आणि आरोग्यासाठी घातक अशा पाण्याने ही शेती सिंचली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे शहरात भेसळयुक्त खाद्यपदार्थ मोठा बाजार मांडला असताना आता यात पालेभाज्यांची सुद्धा भर पडली आहे. भेसळखोरांनी वसईकरांच्या तोंडाचा घास आधीच दुषित केला आहे, रसायन युक्त केळी, घाणीच्या साम्राज्यात खाकरे, फरसाण,  बनावटी, पनीर, दही, दुध, मिठाई बनवणाऱ्या टोळ्या आणि गोडाऊन वसई विरार परिसरात आढळून आले. ही यादी इथेच समाप्त नाही तर फिल्टर पाण्याचे प्लांट,  मावा, तेल, फळे,  फरसाण अशा अनेक प्रदर्थात भेसळ करून वसई विरार परिसरात विकले जात असल्याची माहिती समोर आली होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडला असताना भाजीपाला सुध्दा या यादीत सामील झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि उपनगरातील रेल्वे रूळालगतच्या गटारीतील पिकवल्या जाणाऱ्या भाजी पाल्यासंदर्भात दखल घेत अशा भाजी पिकवणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश मे २०१९ च्या दरम्यान दिले होते. अशा सांडपाण्यावर पिकवलेल्या भाजीपाल्यांची प्रयोगशाळेत  तपासणी करण्यात आली होती.

शेती अशी..

भाजी माफिया सातत्याने वाहते गटार, नाले, डबके, अशा ठिकाणच्या जवळपासच्या जागा शेतकरी, विकासक यांच्याकडून तीन ते चार महिने भाडे तत्वावर घेतात आणि लवकर येणाऱ्या भाजीपाल्याचे पिक घेतात  यात प्रामुख्याने पालक, मेथी, लाल माठ, शेपू अशा पालेभाज्यांबरोबर वांगी आणि मिरची, भेंडी, टोमाटो, मुळा यांचे पिक घेतले जाते. पुन्हा तीन महिन्यानंतर करार वाढविला जातो.