लोकसंस्कृती समृद्ध होण्यासाठी बालरंगभूमी हे प्रभावी माध्यम असून, त्या दिशेने जीवनवादी प्रश्न घेऊन पुढे गेलो तर महाराष्ट्रात सांस्कृतिक चैतन्य निर्माण होऊ शकेल, असा आशावाद पहिल्या अ. भा. मराठी बालनाटय़ संमेलनात झालेल्या एका परिसंवादात व्यक्त केला गेला.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे नाटय़नगरीत रविवारी दुपारी ‘बालरंगभूमी-काल, आज आणि उद्या’ या विषयावर आयोजिलेल्या परिसंवादात अंतर्मुख करणारी चर्चा झाली. डॉ. सतीश साळुंखे (बीड), अशोक पावसकर (मुंबई), संजय पेंडसे (नागपूर), प्रा. देवदत्त पाठक (पुणे), माणिक जोशी (नांदेड), संजय डहाळे (मुंबई) आदींसह अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे सहकार्यवाह भाऊसाहेब भोईर, कोषाध्यक्षा लता नार्वेकर यांनी सहभागी होऊन उपयुक्त मांडणी केली. उत्तरा मोने व शिवानी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
चच्रेला सुरुवात करताना अशोक पावसकर यांनी बालरंगभूमी आपल्यासाठी ‘टॉनिक’ असल्याचे नमूद केले. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी चळवळ म्हणून बालरंगभूमी चालू ठेवल्याचे त्यांनी सांगितले. बालनाटय़ाच्या लेखनाच्या दर्जाविषयी डॉ. सतीश साळुंखे म्हणाले, उपेक्षित जीवनाकडे बालरंगभूमीने पाहिले नाही. मसन जोगी, पारधी, डोंबारी, गोंधळी मुलांचे भावविश्व विखुरलेले आहे. हेसुद्धा बालरंगभूमीसाठी विषय असावेत. एकीकडे अत्यल्प मुले संगणकाशी नाते जुळवून असताना दुसरीकडे अजूनही जगाच्या नकाशावर नसलेल्या गावातील बहुसंख्य उपेक्षित असलेली मुले बालरंगभूमीवर आली पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नाटक हे व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा संदेश पालकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. मुले माध्यमांच्या फार मागे लागली असताना माध्यमांच्या रूपातच स्मार्ट फोनद्वारे क्लििपगच्या मदतीने नाटकांचा विषय पोहोचवावा, अशी सूचना माणिक जोशी यांनी केली. तर संजय डहाळे यांनी, कालची समृद्ध बालरंगभूमी आज डबक्यात अडकली आहे. ती बाहेर काढण्याचे काम कांचन सोनटक्के ह्या संमेलनाध्यक्ष झाल्यामुळे सहजपणे होईल, अशी आशा व्यक्त केली. संजय पेंडसे यांनी नागपुरात केलेल्या बालरंगभूमीवरील विविध प्रयोगांचा मागोवा घेतला. संमेलनात परिसंवादाप्रसंगी पालकांची संख्या रोडावल्याचा मुद्दा निदर्शनास आणून देत लता नार्वेकर यांनी बालरंगभूमी चालवणे म्हणजे सर्कस असते. यात सहनशीलता लागते. मराठी नाटय़ परिषदेने एकांकिका महोत्सवाच्या धर्तीवर बालनाटय़ महोत्सवाचेही आयोजन करावे, अशी सूचना केली.