सावंतवाडीत संस्थान काळात सांस्कृतिक महत्त्व होते. संस्थानचे राजे बापूसाहेब महाराज, शिवराम राजे भोसले यांनी सांस्कृतिक कला जोपासली, त्या कलेचे अधिक संवर्धन करण्यासाठी नगर परिषद कायमच प्रोत्साहन देईल, असा विश्वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला.
नाटय़दर्शन सावंतवाडी आयोजित यक्षगान नृत्य नाटय़ प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी साळगावकर बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अनिल तेंडोलकर, दशत्वात ज्येष्ठ कलाकार बाबा पालव, दिनकर धारणकर, कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष राजन पोकळे, चित्रकार एस. जी. पोलाजी, विजयकुमार फातर्पेकर, रमेश कासकर, प्रा. संजीव सुवर्णा, गोविंद काळे, सचिन धोपेश्वरकर, भरत गावडे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपालिका सांस्कृतिक चळवळीसाठी सर्वाना सहकार्य करण्यास तयार आहे. या शहरात संस्थानने घालून दिलेला वारसा पुढे चालावा म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष व आमदार दीपक केसरकर कायम आग्रही आहेत, असे बबन साळगावकर म्हणाले.
मुंबईचे प्रसिद्ध हृदय-शल्यचिकित्सक डॉ. अनिल तेंडोलकर यांनी मराठी बोलणाऱ्या मुलांना यक्षगान प्रशिक्षण देऊन नाटय़दर्शनने उत्तम कार्य केले आहे. कलासक्त विद्यार्थी कायमच आपल्या कामात आघाडीवर असतात. नाटकात काम केल्याने सर्वाना बरोबर घेऊन जातानाच एकाग्रता अनुभवता येते. कलासक्त व्यक्ती कायमच सर्व स्तरांवर आघाडीवर असल्याचे आपण पाहत आहोत, असे डॉ. तेंडोलकर म्हणाले.
या वेळी गोविंद काळे यांनी नाटय़वेधाची परंपरा सुरू आहे. भविष्याची गरज नाटय़ सांस्कृतिक चळवळीसाठी महत्त्वाची असून प्रत्येक जण जीवनात रंगभूमीचा कलाकार असल्यासारखे वागतो, असे ते म्हणाले. या वेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी रिया देसाई यांनी प्रशिक्षणाचे अनुभव कथन केले. त्यानंतर यक्षगानचे प्रवर्तक प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी यक्षगान प्रशिक्षणार्थीचा कार्यक्रम सादर केला.