अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि.३ जून) अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील ११ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हात राष्ट्रीय आपत्ती दलाच्या पाच तुकडय़ा तर तटरक्षक दल आणि नागरी सुरक्षा दलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी किनारपट्टीवरील भागात वीज पुरवठाही खंडीत केला जाणार आहे.

निसर्ग चक्रीवादळ ३ जून रोजी हरिहरेश्वर येथे धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु हे वादळ आता अलिबागच्या दिशेने सरकले आहे. बुधवारी दुपारी १२ ते १च्या दरम्यान हे चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाचा वेग ताशी ९० ते १२५ किमी असेल. यावेळी किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्’ात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिकांना समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासही निर्बंध घालण्यात आले आहेत. मच्छीमारांना मासेमारीला जाण्यास बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) तीन पथके अलिबागमध्ये तैनात करण्यात आली आहेत. श्रीवर्धल येथे एनडीआरएफचे २ पथक. मुरूड येथे तटरक्षक दलाचे १ पथक, उरण सेथे नागरी सुरक्षा दलाचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर चार नगरपालिका आणि ६२ गावांना या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सुमारे १ लाख ७३ हजार लोक राहतात. त्या सर्वाना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणून रायगड जिल्ह्यातील अलिबाग, उरण, श्रीवर्धन, मुरूड या तालुक्यांमधील कोळी वाडय़ांमधील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

वादळानंतर ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच पाऊस देखील पडणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाय योजना म्हणून किनारपट्टीच्या गावांमधील वीजपरवठा खंडित करण्यात येणार आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी रायगड जिल्हातील लोकांनी घरातून बाहेर पडू नये. जनता कर्फ्यु पाळावा, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.