News Flash

पगारदार कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट

महिन्याच्या सात तारखेला कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार अदा करतात.

बहुतांश कंपन्या, व्यावसायिक प्रतिष्ठाने दर महिन्याच्या सात तारखेला कामगार-कर्मचाऱ्यांचा पगार अदा करतात. त्यामुळे बुधवारी सोलापुरात बँकांतून पगाराची रक्कम घेण्यासाठी कामगार व कर्मचाऱ्यांच्या रागा लागल्या होत्या. परंतु बँकांमध्ये नवे चलनच उपलब्ध नसल्यामुळे जेमतेम चार हजार ते दहा हजारांपर्यंतच पगारापोटी रक्कम अदा झाली. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मागील आठवडय़ात एक तारखेला जमा झालेल्या पगारातील चार हजार ते २४ हजारांपर्यंतच रक्कम मिळाली होती. दुसऱ्या आठवडय़ात पुन्हा रक्कम काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी झाल्यानंतर गेल्या महिनाभर चलनकल्लोळात सर्वाचेच हाल झाले. आणखी किती महिने हालअपेष्टा सहन कराव्या लागणार, या चिंतेने सारेचजण अस्वस्थ आहेत. सोलापुरातून पाचशे व एक हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात सुमारे ३५०० कोटींची रक्कम जमा झाली असता त्याउलट, स्टेट बँक व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ५६५ कोटी इतकेच नवे चलन प्राप्त झाले आहे. हे अपुरे चलनही जवळपास संपल्यामुळे बहुसंख्य बँकांमधील खडखडाट कायम आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर शहर व जिल्ह्य़ात ४२ शाखा कार्यरत असून त्यापैकी नऊ शाखा मोठय़ा आहेत. या बँकेला २२० कोटीप्रमाणे दोनवेळा नवे चलन प्राप्त झाले होते. तर बँक ऑफ इंडियाला १२५ कोटींचे नवे चलन मिळाले होते. पैकी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सोलापूरच्या बाळीवेस शाखेने स्वत:साठी ४४ कोटीची रक्कम घेतली. तर बँकेच्या कोषागार शाखेसह अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, करमाळा, माढा, सांगोला, बार्शी या शाखांना प्रत्येकी तेवढेच चलन उपलब्ध करून दिले होते. याशिवाय बँक ऑफ इंडियाला २० कोटींची रक्कम अदा केली होती. एकूण वाटप केलेल्या रकमेत ३६ कोटीचे चलन शंभर रुपये दराचे होते. परंतु एकूणच उपलब्ध झालेले चलन आता संपले आहे. प्राप्त परिस्थितीशी सामना करण्यासाठी आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाळीवेस शाखेलाच बँकेच्या अन्य शाखांकडे हात पसरण्याची वेळ आली आहे.

यासंदर्भात बँकेच्या बाळीवेस शाखेचे मुख्य व्यवस्थापक सुहास गंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवे चलन नसल्याने अर्थगाडा हाकणे मुश्किलीचे झाले आहे. स्टेट बँकेने स्वत:च्या अखत्यारीत विविध बँकांच्या ५० शाखांना ३२ कोटींचे चलन दिले होते. परंतु आता दररोजचे नियोजन करताना अडचणी येत आहेत.  बँकेच्या कोषागार शाखेने आमच्याकडे ५० लाखांची मागणी केल्याचे गंडी यांनी सांगितले. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जमा झालेल्या मासिक पगारातील पहिल्या आठवडय़ात २४ हजारांच्या मर्यादेत रक्कम अदा केली होती. आता दुसऱ्या आठवडय़ात दहा हजारांपर्यंत पगारातील रक्कम अदा केली जात आहे. स्टेट बँकेच्या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्रकडे पगारदार शासकीय कर्मचाऱ्यांची खाती अधिक प्रमाणात आहेत. परंतु बँक खात्यावर पगार जमा होऊनदेखील संबंधित कर्मचाऱ्यांना पगारातील रक्कम अदा करायला बँक ऑफ महाराष्ट्रला चलनाअभावी प्रचंड अडचणींशी सामना करावा लागत आहे. या बँकेच्या रेल्वे लाईन्स शाखेने तर बुधवारी दुपारीच रक्कम शिल्लक नसल्याने कामकाज बंद झाल्याचे सूचना फलक लावले होते.

बहुसंख्य बँकांनी पगारदार कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातील जमा पगारातील जेमतेम चार हजारापर्यंत रक्कम अदा केली. तर काही मोजक्याच बँकांतून कर्मचाऱ्यांना दहा हजारापर्यंत पगाराची रक्कम अदा करण्यात येत असल्याचे दिसून आले. पगारातील मिळेल ती रक्कम घेण्यासाठी सकाळी बँक सुरू होण्यापूर्वीपासूनच बँकांसमोर खातेदारांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी सर्वाच्या चेहऱ्यांवर प्रचंड त्रागा दिसत होता. बहुतांश बँकांची एटीएम सेबा ठप्पच आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांकडील सुरू असलेल्या एटीएम सेवेतून अडीच हजारापर्यंत रक्कम काढली जात होती. अर्थातच या एटीएम सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:30 am

Web Title: currency shortage in india 6
Next Stories
1 सोलापुरात वाहतूक पोलिसांच्या हाती ‘स्वॅप मशिन’ येणार
2 पांढऱ्या सोन्याला अजूनही झळाळी येईना पाच हजारावरच रेंगाळला बाजारभाव
3 सांगलीत पान दुकानात ‘स्वाइप मशिन’
Just Now!
X