प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादात दोन तरुणांची विवस्त्र धिंड काढून मारहाण करणा-या १२ जणांना बुधवारी पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कडेगाव येथील प्रथम वर्ग न्यायाधीशांनी दिले. तरुणाच्या भावासह पालकांनाही जबर मारहाण करण्यात आली असून दोघा भावांना उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कडेगाव तालुक्यातील नेर्ली या गावात हा अमानुष प्रकार सोमवारी रात्री घडला. गावातील किशोर गोरख मुळीक या तरुणाचे गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्या विवाहासंबंधी उभय कुटुंबांत बोलणीही झाली होती. सोमवारी लग्नासंबंधी एकीकडे बोलणी सुरू असतानाच तणावही वाढत होता. सोमवारी किशोर याच्यासह वडील गोरख मुळीक, आई आशा व थोरला भाऊ मीनानाथ यांना मुलीच्या घरात बोलावण्यात आले.
मुलीच्या घरात उभय कुटुंबात पुन्हा वादावादी झाली. यावेळी वादावादीवेळी मुळीक कुटुंबातील चौघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. किशोर व त्याचा भाऊ मीनानाथ या दोघांना विवस्त्र करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गावातील चौकात ओढत आणण्यात आले. किशोर याच्या गळ्याला गळफास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. दोन तरुणांची धिंड काढून बेदम मारहाण करण्यात येत असल्याचे वृत्त पोलिसांना कळताच तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मारहाण करण्यात आलेल्या दोघा भावांची प्रकृत्ती गंभीर असून दोघांनाही तत्काळ कराडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोरख मुळीक आणि त्यांची पत्नी आशा यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.
यासंदर्भात कडेगाव पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी रात्री या सर्वाना अटक करण्यात आली. परशुराम सुतार, प्रमोद सुतार कौस्तुभ सुतार, चंद्रकांत चन्ने, संजय लोहार, गणेश चन्ने, राधिका सुतार, गणेश पाटील, राजेश कदम, अमोल कुलकर्णी, अजित मुळीक, संजय पवार आणि महेश चन्ने या १२ जणांवर जबरी मारहाण करणे, धिंड काढणे आदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जणांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले असता २७ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.