अलिकडच्या काळात बाजारात जाण्याऐवजी ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसत आहे. मात्र ऑनलाईन खरेदीमध्येही फसवणुकीचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबादेत एका ग्राहकाने ‘फ्लिपकार्ट’ या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन ऑनलाईन मोबाईल मागवला. मात्र प्रत्यक्षात त्याला वीट मिळाली. हा प्रकार रविवारी (दि.१४) सायंकाळी समोर आला आहे. गजानन भानूदास खरात (वय ३४ रा. सुदर्शन नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऑनलाईन वस्तू विक्री करणा-या कंपनीविरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन खरात यांचे एसबीओ शाळेसमोर मोबाईल रिचार्जचे दुकान आहे. ९ ऑक्टोबर रोजी खरात यांनी फ्लिपकार्ट ऑनलाईन वेबसाईटवर मोटो ई. एस ५ हा ९ हजार १३० रुपयांचा मोबाईल ऑनलाईनरित्या बुक केला होता. तसेच त्याचे पैसे देखील ऑनलाईन भरले होते. रविवारी (दि.१४) त्यांच्या दुकानात इस्टाकार्ड या कुरीयर कंपनीचा पार्सल बॉय पार्सल घेवून आला. गजानन यांची सही घेवून पार्सल देवून निघून गेला. त्या नंतर त्यानी आलेले मोबाईलचे खोके उघडून बघितले असता त्यात लाल रंगाचा विटेचा तुकडा आणि ९ हजार १३० रुपये भरल्याची पावती मिळाली.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर गजानन खरात यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी तात्काळ हर्सुल पोलिस स्टेशन गा’त कंपनीच्या विरोधात तक्रार दिली.या प्रकरणाचा पुढील तपास हर्सुल पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनिष कल्याणकर करीत आहेत.