बेकायदा वृक्षतोड; पंचनामा न करताच हजारो टन लाकूड गायब

बोईसर :  बोईसर-तारापूर रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी वनविभागाने वृक्ष तोडण्याची परवानगी दिली असताना  रुंदीकरणात आड न येणाऱ्या वृक्षांची देखील कत्तल करण्याचा प्रकार बोईसरमध्ये घडला आहे.  विशेष म्हणजे ही वृक्ष तोड झाल्यानंतर वन विभागाने त्याचा पंचनामा केला नसतानाही  तोडण्यात आलेली वृक्ष परस्पर ठेकेदारांने लंपास केल्याचेही उघडकीस आले आहे.

बोईसर-तारापूर मुख्य रस्त्यांचे ेरुंदीकरणाचे काम राष्ट्रीय रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.  चित्रालय भागात दुसऱ्या बाजूने रस्तारुंदीकरण करण्यासाठी जागा असताना देखील ७० ते ८० वर्षे जुने असलेल्या वटवृक्षांवर घाव घालण्यात आला. यातच पास्थळ येथे मोठय़ा वृक्षांचा रस्त्यामध्ये अडथळा नसताना देखील त्याची तोड केल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराकडे  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून ही बेसुमार वृक्ष तोड केल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे.

रस्त्यांच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या वृक्षांची तोड करण्यासाठी वनविभागाने परवानगी दिली होती. या नुसार रस्त्यांचे सिमांकन करूनमध्ये येणारी वृक्षांची संख्या व कोणते वृक्ष तोडायचे हे ठरवणे गरजेचे होते. मात्र, वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यातच तोडलेल्या वृक्षांचे पंचनामा करून त्यावर वनविभागाची मोहर लावून ती लाकडे वनविभाग आपल्या ताब्यात घेणे अपेक्षित असताना हे सर्व नियम धुडकावून तोडलेली हजारो टन वृक्षांची लागडे ठेकेदारांने गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे.   या वृक्षतोड प्रकरणाची चौकशी करून  दोषींवर कारवाई करण्याची मागणी  वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

दरम्यान, बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात त्याठिकाणी झाडे लावण्याचे बंधनकारक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष ठेकेराने केल्याचे दिसून येते. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराने त्याठिकाणी वृक्षारोपण केल्याचा दावा केला जात असला तरी याठिकाणी नवीन लावण्यात आलेली वृक्ष कुठेही दिसून येत नाहीत. तर दुसरीकडे  रुंदीकरणात   रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढण्यात आलेली नाही. याभागातील एका बाजूला असलेली अतिक्रमणे काढली असती तरी शेकडो वृक्षांची कत्तल वाचवता आली असती, असे वृक्षप्रेमींकडून सांगितले जाते.

वन विभागाकडे तोडलेल्या वृक्षांची लाकडे ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने बोईसर-तारापूर रस्त्यावरील तोडलेली वृक्ष ठेकेदाराने आपल्याकडे ठेवली आहेत. ही लाकडे ताब्यात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याचा लिलाव केला जाईल.

—निलेश मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग, डहाणू