नागपूरमधील लोकप्रतिनिधींकडून हजारो रुपये उकळले; टोळीवर कारवाईची मागणी

‘मी प्रियंका पवार बोलतेय, तुमच्या शहरातच राहते.. आम्ही काही महिला श्रीनगरमध्ये अडकून पडल्या आहोत. आमचे एटीएम कार्ड, पर्स, मोबाइल सर्वकाही गहाळ झाले आहे. येथून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडून तातडीची आर्थिक मदत हवी आहे..’ असा दूरध्वनी आल्यावर कुणीही लोकप्रतिनिधी निकड ओळखून साहाय्य करण्यासाठी तत्परता दाखवेल, पण अशा ‘ऑनलाइन’ सापळ्यात राज्यातील अनेक आमदारांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे.

अमरावतीचे भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख, गडचिरोलीचे आमदार देवराव होळी आणि एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांचे हजारो रुपये या टोळीने उकळले आहेत. विशेष म्हणजे, या तीन आमदारांची रक्कम एकाच खात्यात जमा झाली आहे. डॉ. सुनील देशमुख हे गेल्या ५ एप्रिलला हैदराबाद येथे गेले होते. तेथे त्यांच्या भ्रमणध्वनीवर एक ‘कॉल’ आला. प्रियंका पवार असे नाव या महिलेने सांगितले. ‘आपले अमरावतीत रुक्मिणीनगरात घर आहे. आई, मुलगी आणि शेजारील महिलांसह आम्ही वैष्णोदवीच्या दर्शनासाठी आलो होतो. तेथून श्रीनगरला पोहोचल्यानंतर या ठिकाणी दंगल उसळली. गोळीबार झाला. या धावपळीत आम्हा सर्वाच्या बॅगा, मोबाइल, आधार कार्ड, एटीएम कार्ड गहाळ झाले. आम्ही रस्त्यावर आलो आहोत. सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला श्रीनगरमधून तात्काळ निघून जाण्यास सांगितले आहे. आम्हाला एका ‘टूर अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स’च्या कार्यालयात पोहोचवून देण्यात आले आहे. टूर ऑपरेटर जम्मूपर्यंत पोहोचवून देण्यासाठी नऊ  हजार रुपये मागत आहे, रकमेची व्यवस्था आपण करावी, १० तारखेला अमरावतीला परतल्यावर आपली रक्कम परत करू,’ असे या महिलेने डॉ. सुनील देशमुख यांना सांगितले. नंतर टूर ऑपरेटरदेखील त्यांच्याशी बोलला. ही रक्कम एका बँक खात्यामध्ये ‘ऑनलाइन ट्रान्स्फर’ करण्याचा सल्लादेखील त्यानेच दिला. महिलांची अडचण ओळखून डॉ. देशमुख यांनी हैदराबादमध्ये असूनही आपल्या मुलाच्या बँक खात्यामधून नऊ हजार रुपये हस्तांतरित केले. डॉ. सुनील देशमुख यांनी अनेक दिवस उलटूनही पैसे परत करण्यासाठी संबंधित महिला न आल्याचे पाहून रुक्मिणी नगरात चौकशी केली, तेव्हा त्या पत्त्यावर प्रियंका पवार नावाची कुणीही महिला राहत नसल्याचे त्यांना समजले. हा प्रकार त्यांच्यासाठी धक्कादायक होता.

असाच प्रकार गडचिरोलीचे आमदार देवराव होळी यांच्यासोबत घडला. या महिलेने स्वत:चे नाव प्रियंका पवार आणि वास्तव्य गडचिरोलीत असल्याचे सांगितले. त्यांनादेखील अशीच कहाणी सांगण्यात आली. होळी यांनी आपल्या मित्राच्या बँक खात्यातून १५ हजार रुपये हस्तांतरित केले. त्यांनी नंतर चौकशी केली, तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना या घटनेला दुजोरा दिला. डॉ. सतीश पाटील यांचीदेखील अशाच पद्धतीने फसवणूक करण्यात आली आहे, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

डॉ. सुनील देशमुख यांनी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्याकडे मौखिक तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली, त्यात हृषीकेश येथील बनावट बँक खात्यातून ही रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. इतर दोन्ही आमदारांची रक्कमही याच बँक खात्यात जमा झाली होती.

आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार उद्वेगजनक आहे. यात मोठी टोळी कार्यरत असावी, असा आपला संशय आहे. या प्रकरणात आपण लेखी तक्रार करणार असून या टोळीची पाळेमुळे शोधून काढण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहोत. इतर दोन आमदारांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे. या टोळीच्या अशा कृत्यामुळे खऱ्या गरजवंतांवर मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.   – डॉ. सुनील देशमुख, आमदार