नगर : लहान मुलांचे लैंगिक शोषण, त्यांच्यावरील अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर (चाइल्ड पोर्नोग्राफी) पाठवणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्य़ात गुन्हे दाखल करण्यास सायबर क्राइम पोलिसांनी सुरुवात केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस दलास राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) १६ व्यक्तींची यादीच पाठवली आहे. त्यातील दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.

महेंद्र ऊर्फ माही भानुदास ठाणगे (३१, रा. कातड्र, राहुरी) याला दि. २३ जानेवारीला तर फिरोज कादर शेख (४१, आलमगीर, शहा कॉर्नर, भिंगार, नगर) याला काल, सोमवारी नगरच्या सायबर क्राइम पोलिसांनी अटक केली. त्यांच्यांकडून व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी वापरलेले दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (बी) अन्वये दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्य़ात ५ वर्षे सक्तमजुरी व १० लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आल्याची माहिती तपासी अधिकारी, सायबर क्राइम पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण परदेशी यांनी दिली. या संदर्भात पोलीस ठाण्याचे हवालदार अरुण सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हायरल करण्यात आलेले शेकडो व्हिडिओ राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने देशभरात उघडकीला आणले. ते आता राज्यातील विविध पोलीस ठाण्यांकडे तपासासाठी पाठवले गेले आहेत. जिल्हा पोलीस दलास १६ व्यक्तींची यादी प्राप्त झाली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हवालदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रावसाहेब हुसळे, राहुल गुंडु, अभिजित अरकल, सम्राट गायकवाड, बाबासाहेब शेलार यांच्या पथकाने फेसबुक प्रोफाइलचे तांत्रिक विश्लेषण करून ते संबंधित फेसबुक अकाउंट कोण वापरत आहे, याची खात्री करण्यात आली, त्यानुसार वरील दोघांना अटक करण्यात आली.