दिगंबर शिंदे, सांगली

खासदारांना अटक झाली, इस्लामपूरकरांनी बॅटऐवजी कपबशी हातात घेतली इथपासून ते मोबाइल हॅक करून चुकीचे संदेश प्रसारित करण्यात यंदाच्या निवडणुकीत ‘समाज माध्यमा’तून व्हायरल झाले. मात्र सूज्ञ मतदारांनी या ‘व्हायरल’ संदेशांना कवडीमोल ठरवित तळपत्या उन्हातही आपले मत नोंदवित सहनशीलतेचा परिचय दिला.

गेले १५ दिवसांपासून चढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच प्रचाराचाही पारा चढला होता. आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले रणमदान रविवारी शांत होताच हातातील स्मार्ट फोनचा वापर मनाजोगा करण्यात येत होता. मदानात उतरलेले भाजपाचे संजयकाका पाटील, स्वाभिमानीचे विशालदादा पाटील आणि वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यात तीव्र चुरस समाज माध्यमातूनही दिसत होती. अगदी जाती-पातीच्या राजकारणाबरोबरच कारखान्याच्या हस्तांतराचा विषय आवर्जुन यात होते.

मात्र यावर कडी झाली ती मतदानाच्या पूर्व संध्येला. महाआघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचा मोबाइल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी चुकीचा संदेश व्हायरल केला. आ. पाटील यांच्या क्रमांकावरून आपणास स्वाभिमानीच्या बॅटऐवजी पडळकरांच्या कपबशीचे काम करायचे आहे. यंदा करेक्ट कार्यक्रम करण्याचे संदेश गावोगावच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले.

मात्र हे चुकीचे संदेश व्हायरल केले जात असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांच्या लक्षात येताच, याबाबत आ. पाटील यांनी रितसर इस्लामपूर पोलीस ठाण्यात याबाबतची अधिकृत तक्रार दाखल केली. आणि पुन्हा नव्याने योग्य ते संदेश देण्यात आले. हा खोडसाळपणा कोणी केला याचा शोध पोलिसांचा सायबर क्राईम विभाग घेत आहे.

दरम्यान, आज मतदानादिवशी तासगावामध्ये खासदार पाटील यांना मारहाण झाली असून त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली असल्याचाही फेक संदेश माध्यमातून प्रसारित करण्यात येत होता. तसेच याच्या पुष्टय़र्थ अडीच वर्षांपूर्वी तासगाव नगरपालिका निवडणुकीतील वादावादीची चित्रफीतही व्हायरल करण्यात येत होती. वंचित आघाडीच्या पडळकर यांनी जातीच्या आधारावर टोकाची टीका केली असल्याचे सांगून समाजाच्या भावना भडकावण्याचाही प्रयत्न काही संदेशातून केला जात होता. तर दुसऱ्या बाजूला महापालिका निवडणुकीप्रमाणे कोणी तरी येईल आणि किती मते आहेत याची विचारणा करून योग्य ती किंमत दिली जाईल या प्रतीक्षेत काही मतदार रात्रीपासून होते. मात्र या विकाऊ मतदाराकडे कोणी फिरकलेच नाही. यामुळे अखेर मत वाया जाणे परवडणारे नाही हे ओळखून मतदारांच्या रांगेत ही मंडळी आली.