नगर : जिल्ह्य़ात सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात, सन २०१९ मध्ये सायबर क्राईमचे एकूण ८७२ गुन्हे दाखल झाले होते. मात्र यंदाच्या वर्षांत पहिल्या दोन महिन्यातच २७० गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली. यातील बहुसंख्य गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. विशेष बाब म्हणजे आजवर उघडकीस आलेल्या सायबर क्राईममधील एकही आरोपी नगर जिल्ह्य़ातील नाही, तर बहुसंख्य आरोपी हे परप्रांतीय आहेत.

गुन्हेगारीचे स्वरुप सातत्याने बदलते असते. तंत्रज्ञानाचा वापर वाढला तशी या क्षेत्राशी संबंधित गुन्हेगारीतही वाढ झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारी वाढीस लागली. पूर्वी पारंपरिक गुन्हे करणाऱ्या टोळ्या माणसाच्या लोभाला बळी पडण्याचा स्वभाव लक्षात घेऊन स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखवत लूटमार करत. या लूट पद्धतीला गुन्हेगारी भाषेत ‘ड्रॉप’ म्हणून संबोधले जाते. मनुष्याच्या याच स्वभावाचा फायदा घेत सायबर गुन्हेगारी क्षेत्रात लूट केली जात आहे. कोणत्याही गोष्टीचे आमिष दाखवत बँक खात्यातून परस्पर पैसे काढून घेण्याचे, अनोळखीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून लूट केली जात आहे. सायबर गुन्हे क्षेत्रात दाखल झालेल्यांपैकी बहुसंख्य गुन्हे हे याच स्वरुपाचे आहेत.

केवळ याच स्वरुपाच्या गुन्ह्य़ांची संख्या २७० पैकी २१५ आहे. त्यातून लाखो रुपयांची लूट झाली आहे. केवळ तंत्रज्ञानाविषयी माहिती असणारेच नाही, तर तंत्रज्ञानाची ओळख, चांगली माहिती असणारेही त्याला बळी पडत आहेत. बँकेतून बोलत असल्याचा बनाव करत माहिती विचारुन खात्याचा ओटीपी क्रमांक मिळवणे व त्याआधारे परस्पर खात्यातून पैसे काढून घेणे, नायजेरिअन फ्रॉड नावाने ओळखले जाणारे परदेशातून फसवले जाण्याचे प्रकार आदी स्वरुपाचे १८ ते २० प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. ओएलएक्सच्या नावाखाली वाहन विक्रीतील संकेतस्थळाचाही वापर वाहनांच्या विक्री व्यवहारातील फसवणुकीसाठी केला जात आहे. गाडी विक्रीचा बहाणा करत खात्यावर पैसे वर्ग करायला सांगितले जाते, सुरुवातीला छोटी नंतर हळूहळू मोठी रक्कम वर्ग करण्यास सांगितले जाते, एकदा फसलेला माणूस अधिक अडकत जातो. अशा स्वरुपाचे ३० ते ३५ गुन्हे दाखल झाले आहेत.

सायबरच्या गुन्ह्य़ातही गुन्हेगारांनी आणखी नावीन्य आणले आहे. एखादे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून किंवा एखाद्या संकेतस्थळ ओपन करायला लावून त्या आधारे डाटा चोरी केली जाते, या मोबाईलच्या डाटामध्ये अनेकदा बँक खाते क्रमांक, पासवर्ड किंवा इतर महत्वाच्या स्वरुपाची माहिती असते. डेबीट किंवा क्रेडीट कार्डचे क्लोनिंग करुन एटीएममधून पैसे काढून चोरी केल्याचे प्रकार झाले आहेत.

सायबर क्राईममध्ये उघड झालेल्या बहुसंख्य गुन्ह्य़ात आरोपी परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही अपवादात्मक गुन्ह्य़ात मुंबईतील आरोपीही आढळले आहेत. मात्र बहुसंख्येने आरोपी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, दिल्ली येथील असल्याचे आढळले आहे. स्थानिक पोलिसांना परप्रांतात जाऊन आरोपींना पकडणे अवघड जाते. तरीही नगरच्या सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्या अनेकांची रक्कम परत मिळवून दिलेली आहे. मात्र त्यासाठी फसवणूक झालेल्याने तातडीने पोलीस किंवा संबंधित बँकेशी संपर्क करणे आवश्यक असते. पोलीसांच्या जनजागृतीमुळे आता फेसबुक किंवा सोशल मिडियाचा वापर करुन बदनामी करणे, धार्मिक भावना दुखावणे अशा स्वरुपाचे गुन्हे आता कमी झाले आहेत. सन २०१९ च्या वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सायबर क्राईमचे जिल्ह्य़ात एकूण ८७२ गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र यंदाच्या जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यातच २७० गुन्हे दाखल झाले आहेत.