भंडारदरा धरणाचे आवर्तन आणखी दोन दिवस वाढविण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. भरणे झाल्याशिवाय आवर्तन बंद करण्यात येणार नाही, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हासरचिटणीस प्रकाश चित्ते यांनी दिली.
भंडारदरा धरणाचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन पूर्वी ठरल्याप्रमाणे दि.५ रोजी बंद होणार होते. पण नॉर्दन ब्रँच कालव्यावर अकरा गावातील शेतक-यांचे भरणे राहिले होते. गोंधवणी, दिघी, निमगावखैरी, शिरसगाव, ब्राम्हणगाव वेताळ, उंदिरगाव, माळेवाडी, मुठेवाडगाव, माळवाडगाव व भोकर या गावातील शेतीला कालव्याचे पाणी मिळाले नव्हते. दुष्काळी परिस्थितीत पिके जळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चित्ते यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला.
 महाजन यांनी दि.८ पर्यंत आवर्तन वाढविण्याचे आदेश दिले. कार्यकारी अभियंता कोळी यांना भरणे झाल्याशिवाय आवर्तन बंद करू नये, असे आदेश देण्यात आल्याचे चित्ते यांनी सांगितले.