झपाटय़ाने नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी रायगड जिल्ह्य़ात येत्या २१ फेब्रुवारीला सायकल रॅली काढली जाणार आहे. सह्य़ाद्री मित्र मंडळ आणि सिस्केप संस्थांच्या माध्यमातून महाड ते साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघरदरम्यान या रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. गिधाडांचे अन्न साखळीतील महत्त्व यानिमित्ताने लोकांना समजवून सांगितले जाणार आहे.

गिधाड पक्षी हा मृत जनावरांवर उपजीविका करणारा, पर्यावरण स्वच्छ राखणारा, अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहे, पण वेगवेगळ्या कारणांमुळे या पक्ष्याचे अस्तित्व सध्या धोक्यात आले. यात उपासमारीमुळे गिधाड मृत होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा नोंदविल्या जात आहे. ही बाब लक्षात घेऊन या सायकल जनजागृती रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.

या अभियानांतर्गत महाड ते गोरेगाव लोणेरेपर्यंतच्या सर्व गावांमध्ये पर्यावरण व वन्यजीवांविषयीच्या संवर्धनाची जबाबदारी व जनजागृती होणार आहे. शिवाय ही जनजागृती सायकलचा वापर करून करण्यात येणार आहे की जेणेकरून सायकल वापरा व प्रदूषण टाळा, असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. या रॅलीत महाड विभागीय वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पत्रकार, महाडमधील ‘रंगसुगंध’सारख्या सामाजिक संस्था, गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व तरुण व महिला मंडळ सहभागी होणार आहेत.

या अभियानाची सुरुवात २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सकाळी आठ वाजता महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथून सुरू होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चवदार तळे असे मार्गक्रमण करीत दासगाव, वीर, टेमपाले, लोणेरे,गोरेगाव पोलीस ठाणे, वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे या अभियानाचा समारोप सायंकाळी ४ वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी प्रेमसागर मेस्त्री- ९६५७८६४२९०, योगेश गुरव- ८८८८२३२३८३, गणेश मेहेंदळे- ९८२२३१८२३१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.