07 July 2020

News Flash

चक्रीवादळाचे संकट; प्रशासन सज्ज; बुधवारी औद्योगिक व व्यापारी आस्थापने बंद

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पालघर शहरात सोमवारी पहाटे जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी परिस्थितीत शहरातील गोठणपूर भागात नगर परिषद कामगार वसाहत वसाहतीमधील वृक्ष उन्मळून पडले. नगर परिषदेच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले होते. (छाया — नीरज राऊत)

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीवर ३ जून रोजी धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज असून ३ जून रोजी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन करताना औद्योगिक व व्यापारी व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहे.

चक्रीवादळ राज्याच्या श्रीवर्धन ते दमणदरम्यानच्या किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता पाहता तयारीच्या दृष्टीने  जिल्ह्य़ातील सर्व तहसीलदार तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पोलीस अधिकारी यांच्याशी तसेच वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी चर्चा केली. जिल्ह्य़ातील सर्व अधिकारी— कर्मचाऱ्यांनी पुढील दोन दिवस आपल्याच कामाच्या ठिकाणी निवास करण्याचे संबंधितांना सूचित करण्यात आले आहे.

३ जून रोजी सर्व दुकाने व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्याच पद्धतीने जिल्ह्य़ातील किनारपट्टी भागातील सर्व उद्योगांना आपली आस्थापने बंद करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.  कच्च्या घरात, धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित करण्यात येत असून तेथील नागरिकांसह वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला यांचे निर्वासन सुरक्षित ठिकाणी करण्याचे काम   २ जूनपासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

१ जूनपासून मासेमारीबंदीचा आदेश असला तरीसुद्धा सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील १०० बोटी सध्या समुद्रात अडकल्या आहेत. या बोटींना किनाऱ्यापर्यंत सुरक्षितपणे आणण्यासाठी तटरक्षक दलाची मदत घेतली जात आहे. पुढील चार दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लहानमोठय़ा बोटी समुद्रात जाऊ  नये यासाठी  दल व सागरी पोलिसांमार्फत दक्षता घेण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील सर्व किनारपट्टीवर नागरिकांसाठी प्रवेशबंदी करण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

किनारपट्टीच्या भागांतील नागरिकांचे स्थलांतर केले जात असताना संबंधित नागरिकांनी आपली औषधे, मास्क, हात धुण्याचे साबण, खाद्यपदार्थ सोबत घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील इतर नागरिकांनी पुरवठा खंडित झाल्यास मेणबत्या, ड्राय बॅटरी चार्जर तसेच दूध व इतर खाद्यपदार्थाचा मुबलक साठा ठेवण्याचे सूचित करण्यात आले आहे.  चक्रीवादळाच्या कार्यकाळात मुसळधार पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी सुरू करण्यात आली असून पालघर व डहाणू येथे एनडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे. तटरक्षक दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा समन्वय साधून आवश्यक ती उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सागरी किनाऱ्यावरील गावांना इशारा

वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार परिसरातील सागरी किनाऱ्यावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. अद्याप कोणतंही गाव खाली केले नसले तरी गरज पडल्यास काही गावे खाली केली जातील यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा करण्यात आली आहे. अर्नाळा, अर्नाळा किल्ला, राजोडी, सत्पाळा, भुईगाव, कळंब, गास, पाचूबंदर, चांदीप, सायवन, कामन, ससूनवघर याठिकाणी तात्पुरते निवारे उभाण्यात आले आहेत. तसेच गरज पडल्यास या विभागातील शाळा आणि सार्वजनिक सभागृहेसुद्धा घेतली जातील. आपत्ती व्यवस्थापन म्हणून एनडीआरएफच्या दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालिका अग्निशमन दलालासुद्धा विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 4:16 am

Web Title: cyclone administration ready industries and shops clostd on wednesday dd70
Next Stories
1 रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
2 धुळ्यात एकाच दिवशी १४ रुग्ण करोनामुक्त
3 पालघर ग्रामीणमध्ये करोना रुग्णांची संख्या शंभरी पार
Just Now!
X