15 July 2020

News Flash

रायगड जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

मालमत्तेचे मोठे नुकसान, एकाचा मृत्यू

(छाया : जीतू शिगवण)

निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला, वादळामुळे मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुक विस्कळीत झाली, अलिबाग तालुक्यात विजेचा खांब अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला.

३ जूनला हे वादळ किनारपट्टीवरील भागात धडकेल, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला होता. दुपारी १२ वाजल्यापासून वादळाला सुरूवात झाली. दुपारी एकनंतर वाऱ्याचा वेग आणखी वाढला. साडेतीन वाजेपर्यंत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला, पोलादपूर, माणगाव, रोहा, तळा, पेण आणि उरण तालुक्यातही वादळाचा प्रभाव दिसून आला. निसर्गाचे रौद्ररूप या निमित्ताने रायगडकरांना अनुभवायला मिळाले. चार वाजेनंतर वादळाचा जोर ओसरण्यास सुरूवात झाली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार अलिबागच्या दक्षिण किनारपट्टीवर हे वादळ धडकले. त्यानंतर जिल्ह्यातून पुढे सरकले. वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, वीजेचे खांब पडणे, सखल भागात पाणी साचणे, आणि घरांची पडझड होणे यांसारख्या घटना घडल्या. अलिबाग तालुक्यातील बंगलेवाडी उमटे येथे दशतर बाबू वाघमारे यांच्या अंगावर विद्युत खांब पडला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वादळामुळे मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील संपर्क यंत्रणा कोलमडून पडली. अनेक घरांची लोखंडी छपरे उडून गेली. ठिकठिकाणी झाडे पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. विद्युत पुरवठाही खंडीत झाला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कुठेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र रोहा तालुक्यातील सोल्वे कंपनीत भिंत पडली.

वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात ६ बचाव पथके  तैनात करण्यात आली आहेत. यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पाच तर तटरक्षक दलाच्या एका पथकाचा समावेश आहे. याशिवाय नागरी सुरक्षा बलाचे एक पथकही तैनात करण्यात आले आहे. मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यावर नागरिकांनी जाऊ  नये अशा सूचना दिला जात होत्या.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण या चार सागरी तालुक्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता लक्षात घेऊ न, १३ हजार ५४१ लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले होते.  यात अलिबाग तालुक्यातील ४ हजार ४०७, पेणमधील ८७, मुरुडमधील २४०७, उरणमधील १५१२, श्रीवर्धनमधील २५५३, म्हसळ्यातील २३९ लोकांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:10 am

Web Title: cyclone hits raigad district abn 97
Next Stories
1 प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे मोठी जिवीत हानी टळली
2 पालघरला चक्रीवादळाची हुलकावणी
3 वेगवान वारे, पावसामुळे मंडणगड, दापोलीत दाणादाण
Just Now!
X