मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र अनलॉक करताना पुन:श्च हरी ओमचा नारा देत तीन तारखेपासून टप्प्या टप्प्यानं लॉकडाउन उठवण्याची घोषणा केली आहे. परंतु मुंबईकरांनो उद्यापासून म्हणजे तीन तारखेपासून मॉर्निंग वॉकपासून दुकानांपर्यंत अनेक गोष्टी खुल्या होत असल्या तरी तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागणार आहे, कारण आहे निसर्ग चक्रीवादळ… मुंबईच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबईच्या इतक्या जवळून चक्रीवादळ जाणार आहे. मुंबईपासून अवघ्या ११० किमी अंतरावर पालघरजवळ निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी ११५ ते १२५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा स्कायमेट या खासगी वेधशाळेने दिला आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उद्या (३ जून २०२०) काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. केंद्रीय जल आयोगाने सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई आणि नाशिकमधील काही भागांमध्ये फ्लॅश प्लड (म्हणजेच अचानक मोठ्याप्रमाणात आलेला पाण्याचा प्रवाह) येण्यासंदर्भातील इशारा दिल्याचेही स्कायमेटनं म्हटलं आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये तसेच गुजरामध्येही उंच लाटा उसळतील असा इशाराही स्कायमेटनं दिला आहे.

२ जून रोजी संध्याकाळी पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्यावर निसर्ग चक्रीवादळ तडाखा देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दल अर्थात एनडीआरएफच्या १६ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी तीन तुकड्या मुंबईत, प्रत्येकी दोन पालघर आणि डहाणूत तैनात करण्यात आल्या आहेत. दहा तुकड्यांना किनारी प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये नियुक्त करण्यात आलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ तीन जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. “निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >चक्रीवादळं म्हणजे काय?, चक्रीवादळांचा इशारा कधी दिला जातो?, त्यांना नावं कशी दिली जातात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करून या चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.