‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेले जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वाहक खांब कोसळल्याने व तारा तुटल्याने छोट्या मोठ्या गावातील, दुर्गम व डोंगराळ भागातील तीन लाख नागरीकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महाबळेश्वर-पाचगणी ही गिरीस्थानं तर साठ तासांपासून अंधारात आहेत.

जोरदार वाऱ्यामुळे महावितरणचे ४५ उच्चदाब व २२० लघुदाब खांब वाकले आणि तुटल्यामुळे त्यावरील वीजवाहक तारा तुटून पडल्या. १४ उपकेंद्र बंद पडली तर १३९ वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला. जोरदार वाऱ्यामुळे सातारा शहर, औंध, वडूज, दहिवडी, खटाव, पाटण, जावळी, वाई, पाचगणी, महाबळेश्वर येथील वीज पुरवठा खंडित झाला. वाई, पाचगणी, महाबळेश्वर वीज मार्गावर एकशे सत्तावीस लहानमोठी झाडे, झाडांच्या फांद्या पडल्याने या भागात वीज वितरणचे मोठे नुकसान झाले आहे.

नुकसानीची माहिती मिळताच बारामती वीज परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी नुकसानचा आढावा घेत नुकसान झालेल्या ठिकाणी ज्यादा ठेकेदार त्यांचे कर्मचारी, साहित्य देत भर पावसात बुधवारी दुपारी कामाला सुरवात केली. प्रभारी अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांच्यासह सर्व अभियंते कामाला उतरले. सुरवातीला सातारा, औंध, वडूज, दहिवडी, खटाव आदी भागातील वीज पुरवठा सुरळीत केला गेला. १४ पैकी १३ व १३९ पैकी ११६ वीज वाहिन्याचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर रोहित्र दुरुस्ती व खाजगी तक्रारी निपटण्यात येत होत्या.

सातारा, कराड, फलटण वडूजचा वीज पुरवठा सुरळीत झाला. पण वाई, पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा येथील जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून व झाडांच्या फांद्या पडल्याने ३२ उच्च दाब व १२५ लघुदाब वीज खांब व तारा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. आज सकाळपासून प्रभारी अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी कार्यकारी अभियंता सोनवलकर यांच्या समवेत वाई, पाचगणी व महाबळेश्वर जावळीला प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. ठेकेदार व साहित्य उपलब्ध करण्याची व्यवस्था केली आहे.

आता वाई शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून पाचगणी व महाबळेश्वर शहरातील वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर तापोळा केंद्राचा वीज पुरवठा पर्यायी व्यवस्था करीत सुरु करण्यात आला आहे.