15 July 2020

News Flash

मुंबईचा धोका टळला! चक्रीवादळानं बदलली दिशा

Cyclone Nisarga Live Updates in marathi : निसर्ग चक्रीवादळाची प्रत्येक घडामोड वाचा मराठीत एकाच ठिकाणी

करोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रासमोर एक नैसर्गिक आपत्ती रौद्ररूप धारण करून उभी ठाकली आहे. मंगळवारपासून कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आलं आहे. चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत असून, रायगडसह किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, ठाणे, रायगडसह पुण्यातील काही भागाला तडाखा बसणार आहे.

Live Blog

18:10 (IST)03 Jun 2020
मुंबईतील हवाई वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय

निसर्ग चक्रीवादळ अलिबाग ओलांडून मुंबईच्या दिशेनं येत असल्यानं वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई विमानतळावरून असलेल्या हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला होता मुंबई विमानतळावरील वाहतूक सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता मुंबईवरील धोका टळल्यानं सहा वाजल्यापासून पुन्हा हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

17:02 (IST)03 Jun 2020
मुंबईचा धोका टळला! चक्रीवादळानं बदलली दिशा

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली असून, चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या हवाल्यानं स्कायमेटनं हे वृत्त दिलं आहे.

16:08 (IST)03 Jun 2020
चक्रीवादळाचा तडाखा; मुंबई विमानतळावरील विमान वाहतूक ७ वाजेपर्यंत बंद

निसर्ग चक्रीवादळा अलिबाग ओलांडून मुंबईच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई विमानतळावरून असलेल्या हवाई वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावरील वाहतूक सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

15:28 (IST)03 Jun 2020
'निसर्ग'चा तडाखा; रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित

'निसर्ग'नं रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला आहे. वादळाचा काही भाग अजूनही समुद्रात असला, तरी ताशी ११० किमी वेगानं धावणाऱ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे. वादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल सेवा खंडित झाली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली.

15:07 (IST)03 Jun 2020
चक्रीवादळ अजूनही समुद्रातच; पुढील सहा तास निसर्ग घालणार धुमाकूळ

निसर्ग चक्रीवादळाचं मुख्य केंद्र अजूनही अरबी समुद्रात असूनही ते जमिनीवर येण्यासाठी तासाभराचा अवधी लागणार आहे. त्यानंतर 'निसर्ग' चक्रीवादळाचं तांडव सुरू होणार आहे. वाऱ्याचा वेग वाढला असून, पुढील सहा तासानंतर निसर्गचा जोर कमी होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

14:36 (IST)03 Jun 2020
निसर्ग चक्रीवादळानं जोर पकडला; धडकी भरवणारा वाऱ्याचा वेग

निसर्ग चक्रीवादळानं किनारपट्टी भागात वादळ सक्रीय झालं आहे. चक्रीवादळानं आक्राळ विक्राळ रुप धारणं केलं असून, धडकी भरावी, असा वाऱ्याचा वेग आहे.

14:36 (IST)03 Jun 2020
निसर्ग चक्रीवादळ नाशिकलाही धडकण्याची शक्यता, नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे; प्रशासनाचं आवाहन

हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे. (वाचा सविस्तर)

14:27 (IST)03 Jun 2020
विध्वंस...विध्वंस...आणि विध्वंस

चक्रीवादळानं विध्वंस करायला सुरूवात केली आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये वादळाचा वेग वाढला असून, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. त्याचबरोबर घराचंही नुकसान झालं आहे. 

14:25 (IST)03 Jun 2020
महाराष्ट्रात NDRF च्या २१ तुकड्या तैनात, तब्बल एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. निसर्ग चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अशी माहिती एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक एस एन प्रधान यांनी दिली आहे. (सविस्तर वृत्त)

14:18 (IST)03 Jun 2020
'निसर्ग'चं तांडव सुरू; छतावरील पत्रे क्षणार्धात गेली उडून

निसर्ग वादळ हळूहळू पुढे सरकत असून, आता विध्वसाला सुरूवात झाली आहे. दापोली येथे एका इमारतीच्या छतावर बसण्यात आलेली पत्रे वादळाच्या वेगानं क्षणात हवेत भिरकावली गेली.

14:13 (IST)03 Jun 2020
कितीही वादळं येऊ द्या...; नितेश राणे यांनी शेअर केला शिवरायांच्या पुतळ्याचा वादळातील व्हिडीओ

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकलं आहे. वादळानं जमिनीला स्पर्श केला असून, तांडव सुरू झालं आहे. नुकसानीची असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. आमदार नितेश राणे यांनी चक्रीवादळात डौलानं फडकणारा भगवा झेंडा आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर "कितीही वादळं येऊ द्या..., काही फरक पडत नाही, जय शिवराय!,' असं म्हटलं आहे.

13:50 (IST)03 Jun 2020
राज्यात एनडीआरएफचे २१ पथक तैनात

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एनडीआरएफची ४३ पथकं तैनात करण्यात आली आहेत. यापैकी महाराष्ट्रात २१ पथकं असून, जवळपास १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ही माहिती दिली.

13:36 (IST)03 Jun 2020
वाऱ्याचा जोर वाढला; लाटांच्या किनाऱ्यावर धडका

चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला स्पर्श केला असून, समुद्रही खवळला आहे. लाटा किनाऱ्यावर येऊन धडकू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील हे दृश्य.

13:23 (IST)03 Jun 2020
पुढचे तीन तास कसोटीचे

अखेर निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जमिनीवर धडकलं असून, त्याचा प्रकोप पुढील तीन तास मुंबई, रायगड, रत्नागिरी या कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना जाणवणार आहे. घरांचे पत्रे उडून जाणं, हजारो झाडं कोसळणं यासारख्या घटनांना सुरूवात झाली असून पुढील तीन तास अत्यंत कसोटीचे ठरणार आहेत. या सर्व प्रदेशातील जनतेनं घरीच व सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलं आहे.

13:12 (IST)03 Jun 2020
तुफान आलं या! निसर्ग चक्रीवादळाची महाराष्ट्राच्या दारावर थाप; जमिनीला केला स्पर्श

निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. हे वादळ किनारपट्टीजवळ येऊन ठेपलं आहे. वादळानं जमिनीला स्पर्श केला असून, पुढील तीन तासात ते सक्रीय होणार आहे. राज्याच्या ईशान्येकडील भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे.

12:56 (IST)03 Jun 2020
तुफान आलं या! काही तासात निसर्ग देणार महाराष्ट्राला धडक

महाराष्ट्राला करोनानंतर सध्या धडकी भरली आहेत ती निसर्ग चक्रीवादळाची. हे वादळ सध्या महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. काही तासात महाराष्ट्राला चक्रीवादळ धडक देणार असून, त्यापूर्वीच वेगवानं वारे आणि पावसाला सुरूवात झाली आहे. अलिबागमधील हे दृश्य.

12:47 (IST)03 Jun 2020
'निसर्ग'चा धोका लक्षात घेऊन राणीच्या बागेतील प्राण्यांचा करण्यात आला 'असा' बचाव

निसर्ग या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबईतील राणीचा बाग अर्थात वीरमाता जिजामाता भोसले उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. राणीच्या बागेतल्या या प्राण्यांना त्यांच्या पिंजऱ्यात असलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आलं आहे. झाड पडून किंवा इतर कोणतीही आपत्ती येऊन त्यांना इजा होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ट्विट करुन या संदर्भातली माहिती दिली आहे.

12:38 (IST)03 Jun 2020
रायगडमध्ये वृक्ष उन्मळून पडले

निसर्ग चक्रीवादळामुळे सोसायटयाचे वारे वाहत असून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. पुढच्या तासाभरात हे वादळ महाराष्ट्रात धडकणार आहे.

12:30 (IST)03 Jun 2020
रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात; श्रीवर्धन, मुरुड, अलिबागमध्ये तुफान पाऊस

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त,र वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. (वाचा सविस्तर)

11:59 (IST)03 Jun 2020
समुद्राला उधाण! संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; ४०,००० नागरिकांना हलवलं

निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररुप धारण केलं असून, किनारपट्टी भागासह राज्यात अनेक ठिकाणी वादळा पाऊस सुरू झाला आहे. वाऱ्याची गती वाढली असून, समुद्रालाही उधाण आलं आहे. लाटा किनाऱ्याला धडका मारू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जीवित हानी टाळण्यासाठी ४० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. तसेच किनारपट्टी भागात एनडीआरएफच्या तुकड्या मदत कार्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

11:48 (IST)03 Jun 2020
किनारपट्टीलगतच्या ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

चक्रीवादळ हळहळू महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असून, त्याआधीच एनडीआरएफच्या जवानांनी राज्याच्या किनारपट्टी भागात असलेल्या ४० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

11:29 (IST)03 Jun 2020
असं येतंय निसर्ग चक्रीवादळ; गोव्यातील रडारनं टिपल्या हालचाली

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू झाला आहे. हे चक्रीवादळ ताशी ११० ते १२० किमी वेगानं येत असून गोव्यातील रडारनं या वादळाच्या हालचाली टिपल्या आहेत.

11:08 (IST)03 Jun 2020
वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

अरबी समुद्रात निर्माण झालेलं निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.(वाचा सविस्तर)

11:00 (IST)03 Jun 2020
मुंबई, ठाणे आणि रायगडला बसणार तडाखा; हवामान विभागाचा अंदाज

निसर्ग चक्रीवादळानं रुद्रावतार धारण केला असून, महाराष्ट्राच्या दुपारी चारपर्यंत हरिहरेश्वर ते दमन किनारपट्टीला धडकणार आहे. हे वादळ अलिबागच्या खूप जवळ आले असून, शंभर ते १२० किमी वेगानं चक्रीवादळ मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून पुढे जाणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूजंय मोहापात्रा यांनी ही माहिती दिली.

10:54 (IST)03 Jun 2020
दुपारी १२.३० ते २.३० दरम्यान घराबाहेर पडू नका

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल व उरणमधील नागरिकांना दुपारी १२.३० ते अडीच वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याची प्रांतधिका-यांची सूचना केली आहे. दुपारी एक ते तीनच्या दरम्यान हे वादळ अलिबागला धडकण्याची शक्यता आहे.

10:41 (IST)03 Jun 2020
दुपारी एक नंतर अलिबागला धडकणार निसर्ग चक्रीवादळ

"निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १९० किलोमीटर तर अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर आहे. आज दुपारी एक ते तीनच्या दरम्यान हे चक्रीवादळ अलिबाग किनारपट्टीवर धडकेल. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर असेल" अशी माहिती मुंबईतील भारतीय हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिली.

10:35 (IST)03 Jun 2020
'निसर्ग' धडकणार; समुद्र खवळला

हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे आज (३ जून) दुपारी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार आहे. सध्या चक्रीवादळ तीव्र झालं असून, महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करत आहे. त्यामुळे समुद्र खळवला आहे. 

10:32 (IST)03 Jun 2020
काही तासांत अलिबाग किनाऱ्यावर धडकणार ‘निसर्ग’ चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये हे वादळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात वारा आणि पावसाचा जोर वाढला असून १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (वाचा सविस्तर)

10:21 (IST)03 Jun 2020
मुंबईपासून १७५ कि.मी. अंतरावर पोचलं चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून अवघ्या १७५ कि.मी. अंतरावर पोचले आहे. दुपारच्या सुमारास ते महाराष्ट्राला धडकेल असा अंदाज आहे. सुमारे ११० ते १२० कि.मी. प्रति तास वेगाने निसर्ग धडकणार असल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच सुरक्षित ठिकाणी रहावे, असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. या वादळामुळे झाडे, विजेचे खांब, मोबाईल टॉवर पडण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन शासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

10:16 (IST)03 Jun 2020
भगवती बंदरात नांगर तुटल्याने जहाज भरकटले

निसर्ग वादळाचा धसका घेऊन रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या २ जहाजांनी मंगळवारी (२ जून) सायंकाळनंतर आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून, जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने तो जहाज भरकटत असल्याचे चित्र मिरकरवाडा, भगवती बंदरात पहायला मिळत आहे.

10:14 (IST)03 Jun 2020
भगवती बंदरात नांगर तुटल्याने जहाज भरकटले

निसर्ग वादळाचा धसका घेऊन रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या २ जहाजांनी मंगळवारी (२ जून) सायंकाळनंतर आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून, जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने तो जहाज भरकटत असल्याचे चित्र मिरकरवाडा, भगवती बंदरात पहायला मिळत आहे.

10:07 (IST)03 Jun 2020
'निसर्ग'नं घेतलं रौद्ररुप; दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान अलिबागमध्ये दाखल होणार

निसर्ग हे वादळ आता तीव्र चक्रीवादळ बनले आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून २०० किमी अंतरावर असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दिशेने येत आहे. रौद्ररुप घेतलेलं निसर्ग चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान अलिबागच्या दक्षिण दिशेला धडकणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी ही माहिती दिली.

09:50 (IST)03 Jun 2020
गती वाढली! निसर्ग चक्रीवादळाची महाराष्ट्राकडे कूच; ताशी १२० किमी वेगाने धडकणार

चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. रत्नागिरीत वाऱ्याची गती वाढली आहे. सकाळी वाऱ्याचा वेग प्रतितास ५५ ते ६५ किमी इतका होता. कोकण किनारपट्टीवर येईपर्यंत वादळाचा वेग ७५ किमी प्रतितास इतका होणार आहे. सध्या वादळ अलिबागपासून १३० किमी दूर असून, वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास इतका होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

09:30 (IST)03 Jun 2020
मुंबईच्या किनाऱ्यावर उसळणार उंच लाटा

चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी ४.२६ मीटरची उंच लाट उसळणार आहे, तर दुसरी उंच लाट रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी उसळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या उंच लाटेची उंची ४.०८ मीटर असणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

09:27 (IST)03 Jun 2020
कारने प्रवास करत असाल तर हातोडा जवळ ठेवा; बीएमसीची सूचना

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार-जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. पाण्यात गाडी अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन ठेवावे असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)

09:25 (IST)03 Jun 2020
रायगडमध्ये संचारबंदी जारी, 11 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि.३ जून) अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील ११ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर)

09:23 (IST)03 Jun 2020
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नेमकं काय नुकसान होऊ शकतं?

निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन राज्यातील समुद्र किनारी तसेत सखल भागात घरे असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.वाचा सविस्तर बातमी.

09:07 (IST)03 Jun 2020
रायगडमध्ये ११ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

निसर्ग चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीनं जीवितहानी होऊ नये म्हणून प्रशासनानं प्रयत्न सुरू केले आहेत. एनडीआरएफची पथके सध्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम करत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील ११ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.

08:40 (IST)03 Jun 2020
मिरा भाईंदरमधून लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

एनडीआरएफच्या पथकांकडून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. मिरा भाईंदरमधील उत्तन गावातील नागरिकांना चक्रीवादळाच्या धोक्यामुळे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

08:36 (IST)03 Jun 2020
चक्रीवादळाची चाहुल; रत्नागिरीत वेगवान वाऱ्यासह पावसाला सुरूवात

निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी उत्तर रत्नागिरी भागात वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्याचबरोबर पाऊसही सुरू झाला आहे.

08:08 (IST)03 Jun 2020
एनडीआरएफकडून पाहणी किनारपट्टी भागाची पाहणी

राज्यात मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, जवानांनी बुधवारी पहाटे रायगड येथे किनारपट्टी भागाची पाहणी केली.

07:59 (IST)03 Jun 2020
'निसर्ग'चे महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊलं; वाऱ्याचा वेगही वाढला

निसर्ग चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या दिशेनं कुच करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या सहा तासांपासून प्रतितास १३ किमी वेगानं हे चक्रीवादळ किनारपट्टीकडे येत आहे. अलिबागच्या नैऋत्य दिशेला १५५ किमी, तर मुंबईपासून २०० किमी अंतरावर दक्षिण नैऋत्य दिशेला आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली.

07:51 (IST)03 Jun 2020
पालघर समुद्र किनाऱ्यावर एनडीआरएफकडून पाहणी

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील यंत्रणा सज्ज झाली असून, एनडीआरएफनंही मंगळवारी रात्रीपासूनच मोहीम सुरू केली आहे. वादळापूर्वी पालघर येथील समुद्र किनाऱ्यावर पथकानं पाहणी केली.

07:46 (IST)03 Jun 2020
कोळीवाड्यातील नागरिकांना पहाटेच सुरक्षित स्थळी हलवलं

निसर्ग चक्रीवादळ आज धडकण्याचा अंदाज असून, त्यासाठी एनडीआरएफच्या तब्बल १० तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. बुधवारी भल्या पहाटे एनडीआरएफच्या तुकड्यांनी विशेष मोहीम हाती घेत अलिबाग येथील कोळीवाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी ही माहिती दिली.

07:43 (IST)03 Jun 2020
समुद्राला उधाण; नुकसान होण्याची भीती

आज, बुधवारी चक्रीवादळ अलिबागच्या जवळ येईल तेव्हा ताशी ११० ते ११० किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे.  या संपूर्ण काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या दरम्यान समुद्रात मोठय़ा लाटा उसळण्याची शक्यता आहे. समुद्राकाठच्या क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, विद्युत वाहिन्या, कच्ची घरे, झाडे यांना हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

07:42 (IST)03 Jun 2020
मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज

बुधवारी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्य़ांना काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

07:41 (IST)03 Jun 2020
३ नंबरचा बावटा’ फडकवला

मच्छीमारांना धोक्याची सूचना देण्यासाठी अलिबाग किनाऱ्यावर मंगळवारी ‘३ नंबरचा बावटा’ फडकविण्यात आला. हा ३ नंबरचा बावटा धोकादायक स्थितीतच फडकावला जातो. गेल्या वर्षी राज्यात दोन वेळा वादळांपूर्वी तो फडकावण्यात आला होता. अशा प्रकारचे एकूण १२ बावटे असतात.

Next Stories
1 २२ हजार नागरिकांचे स्थलांतर
2 भूमाफियांकडून वनईमधील टेकडीचे सपाटीकरण
3 शिमला मिरचीला ‘करोनाची बाधा’
Just Now!
X