15 July 2020

News Flash

पालघरला चक्रीवादळाची हुलकावणी

तणावाखाली असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला दिलासा

‘निसर्ग’ चक्रीवादळ सर्वप्रथम पालघर जिल्ह्य़ातील समुद्र किनाऱ्यांना धडकणार असा अंदाज होता. खबरदारी म्हणून ओढावणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली होती. मात्र , चक्रीवादळाने पालघर जिल्ह्य़ाला हुलकावणी देत आपला मार्ग बदलून दक्षिण दिशेला गेले.

तणावाखाली असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला दिलासा

पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे उद्भवलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळाने पालघरला  हुलकावणी दिली. वादळ प्रथम पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज होता. मात्र, ते दक्षिणेच्या बाजूला सरकले. काही किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तीय हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. संकट टळल्यामुळे दोन दिवसांपासून तणालवाखाली असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला दिलासा मिळाला.

चक्रीवादळाचा धोका पाहत खबरदारी म्हणून जिल्ह्यातील महसूल, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, महावितरण तसेच आरोग्य व्यवस्था यांनी त्या दृष्टीने तयारी केली होती. पालघर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन तुकडय़ादेखील तैनात झाल्या होत्या. सोमवापर्यंत खोल समुद्रात मासेमारी करीत असलेल्या ५७७ मासेमारी बोटींपैकी जवळपास सर्वच बोटी टप्प्याटप्प्याने मंगळवारी रात्रीपर्यंत विविध बंदरामंध्ये सुखरूप पोहोचल्या होत्या.

मासेमारीकरिता गेलेल्या बोटींना परतण्यासाठी तटरक्षक दलाची महत्त्वपूर्ण योगदान झाल्याचे सांगून जिल्ह्यातील सातपाटी, दांडी, मुरबा व डहाणू परिसरातील किनारपट्टीच्या गावांमध्ये अधिकारी वर्गाने बैठका घेऊन लोकांमध्ये चक्रीवादळाविषयी  मार्गदर्शन केले. चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार नागरिकांची त्यांच्या नातेवाईकांकडे आणि ठरवून दिलेल्या आश्रयस्थानी स्थलांतर करण्यात आले.  दिवसभरात  काही ठिकाणी किरकोळ व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यातील यंत्रणांनी एकत्रितपणे या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वसई, पालघर, डहाणू तसेच वाडा तालुक्यातील उद्योग व व्यापारी आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे या सर्व भागांमध्ये दिवसभरात लोक घरामध्ये राहिल्याचे चित्र होते. पालघरच्या किनारपट्टीवर गेल्या अनेक वर्षांत चक्रीवादळाचा फटका बसला नसल्याने खबरदारी म्हणून  किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न केले असता काही नागरिकांनी विरोध केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

डहाणूतील २५० कुटुंबाचे स्थलांतर

डहाणू : निसर्ग चक्रीवादळादरम्यान अतिवृष्टीच्या भीतीने घोंघावणाऱ्या वादळामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून डहाणू समुद्रकिनाऱ्यावरील, डहाणू खाडी, डहाणू गाव, दुबळपाडा, सतीपाडा, नगरपड येथील २५०हुूा अधिक कुटुंबांना मंगळवारी संध्याकाळी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

या वेळी स्थलांतरित कुटुंबांना सेंट मेरी हायस्कूल, पोंदा हायस्कूल येथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. कच्च्या घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे प्रशासनाने आवाहन केले. वाढवण, वरोर, चिंचणी, चिखले, बोर्डी किनारपट्टी परिसरात वादळाच्या भीतीचे वातावरण नसले तरी प्रशासनाने सतर्क केल्यामुळे डहाणू गाव, डहाणू खाडी, नरपड या भागात स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे  जीवित आणि वित्तहानीपासून धोका टाळण्यासाठी  सुरक्षिततेसाठी महसूल, पोलीस प्रशासन आणि नगर प्रशासनाकडून किनारपट्टीच्या परिसरात मंगळवारी जनजागृती करण्यात आली.

साहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तहसीलदार राहुल सारंग, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी, नगरसेवक शमी पिरा, स्थानिक मच्छीमार उपस्थित होते. निसर्ग वादळाच्या भीतीने मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱ्याला स्थिरावण्यात आल्या होत्या. रात्रभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे डहाणू किनारपट्टीला दुपारी १च्या दरम्यान अपेक्षित वादळाची भीती निर्माण झाली होती. सर्वत्र पावसाचे वातावरण तयार झाल्याने नागरिक घरातच राहून प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष लावून होते. दरम्यान, सुरक्षिततेसाठी डहाणू किनारी एनडीआरफची तुकडी, पोलीस प्रशासन, महसूल खाते, तटरक्षक दल, कस्टम आणि  स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होती

डहाणू किनारपट्टीवरील गावातील २५०हून अधिक कुटुंब स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहेत. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी दक्षता घेतली आहे.

राहुल सारंग, तहसीलदार, डहाणू

सुटकेचा नि:श्वास

पालघर : पालघर समुद्र किनारपट्टीला धडकणारे संभाव्य निसर्ग चक्रीवादळाचे संकट  टळल्यामुळे  तालुक्यातील दातीवरे पासून ते मुरबे समुद्र किनारपट्टीलगतच्या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पालघर तालुक्यातील दातिवरे ते मुरबे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्याच्या हालचालीही मंगळवारी संध्याकाळपासून सुरू केल्या होत्या. मोठा धोका असलेल्या सातपाटी गावांमधील सुमारे ४० कुटुंबांतील दीडशे नागरिकांना येथील राधाकृष्ण मंदिरात सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले होते. मासेमारी बंद  असल्याकारणाने बहुतांश मच्छीमारांनी आपल्या मच्छीमार नौका किनाऱ्यालगत नांगरून ठेवल्या. मात्र तरीही मासेमारीसाठी गेलेल्या दोन नौका समुद्रामध्ये अडकून पडल्या असल्याची चर्चा मासेमार बांधवांमध्ये होते.  दातिवरे ते मुरबे किनारपट्टी भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

बागायतदारांना दिलासा

चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या गावांमध्ये असणाऱ्या मोठय़ा प्रमाणातल्या पानसुपारी तसेच पानवेली व भाजीपाल्याची मोठी लागवड असलेल्या बागायतदारांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती हे वादळ या भागात धडकले असते तर मोठय़ा प्रमाणात बागायतदारांचे नुकसान होण्याची शक्यता होती. मात्र संकट टळल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला. खबरदाराची उपाय म्हणून  वादळ आल्यास  योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कृषी विभाग किनारपट्टीलगतच्या बागायतीमध्ये तळ ठोकून होते.

 

झाडे उन्मळून पडली

वसई-विरारमध्ये बुधवारी सकाळपासून विविध भागांत सोसाटय़ाचा वारा सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या.  विरार पूर्वेला एका चाळीवर कडूनिंबाचे झाड पडले. गुरुदत्त नगर, विवा तारांगण परिसरातील रस्त्यावर झाड पडल्याच्या घटना घडल्या. नंदाखाल येथील एका घरावर जांभळाचे झाड पडले. शहरातील विविध भागांत झाडे पडण्याच्या घटना दिवसभर घडत होत्या. दुपापर्यंतच्या घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. पडलेली झाडे उचलणे आणि रस्ता मोकळा करम्ण्याची कामे सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी दिली.

किनारे शांत

बोईसर : पालघर किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले होते. मात्र, वादळाने हुलकावणी दिल्याने येथील दांडी, नांदगाव, नवापूर, तारापूर व चिंचणी समुद्र किनारे शांतच होते. समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असे प्रशासकीय आवाहन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी पावसाने सुरुवात केली होती. मात्र सकाळी ११ नंतर पाऊस थांबला.  तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू होता.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखानदारांनी आपले रासायनिक उत्पादन घेणारे कारखाने बंद ठेवले होते. कारखान्यात अत्यावश्यक गोष्टींसाठी लागणारे कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. नेहमीच गजबजलेल्या असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील रस्ते पूर्णपणे मोकळे होते तर परिसरात शुकशुकाट होता.

वसईवर तुरळक प्रभाव

विरार : निसर्ग चक्रीवादळाचा कोणताही मोठा परिणाम वसई-विरार शहरावर झाला नाही. मंगळवार रात्रीपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू होता आणि किनारपट्टी भागांत सोसाटय़ाचा वारा सुटला होता. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी वसईतील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. खबरदारी म्हणून सागरी किनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.

निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध ठिकाणी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था  करण्यात आली होती. यासाठी शाळा, मंदिरे, सभागृह आणि समाज मंदिरे राखीव केली गेली होती. अर्नाळा, अर्नाळा किल्ला, राजवडी, सत्पाळा, भुईगाव, कळंब, गास, पाचूबंदर, चांदीप, सायवन, कामन, ससूनवघर या गावांतील दीड हजारहून अधिक रहिवाशांना सुरक्षितरीत्या स्थलांतरित करण्यात आले होते.  त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पालिका अग्निशमन दलसुद्धा सज्ज झाले होते.

पण दुपापर्यंत वादळाची तीव्रता कमी झाल्याने त्याचा फारसा प्रभाव वसईत जाणवला नाही. काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या आणि किरकोळ घटना समोर आल्या. पण कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. टाळेबंदी आणि प्रशासनाने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्यास सांगितल्याने आणि सर्व दुकाने बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. कुठेही अपघाताची कोणतीही नोंद  नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

वादळामुळे कोणतेही नुकसान झाले नसले तरी मात्र दिवसभर ‘बत्तीगुल’ झाल्याने वसईकरांना विजेचा त्रास सहन करावा लागला. पण  रात्रभरापासून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण केल्याने वसईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जनव्यवहार बंद

विरार : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यामुळे बुधवारी वसई-विरारमधील जनजीवन पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. हवामान खात्याने निसर्ग चक्रीवादळाची दिशा पालघर आणि वसईत दाखवली होती. त्यानुसार किनारपट्टीसह वसई तालुक्यातील १२ गावे बाधित होणार होती. त्यासाठी प्रशासनाने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. कुणालाही घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यामुळे वसई-विरारमधील रस्त्यावर शुकशुकाट होता. एरवी रस्त्यावर असणारी वाहनेदेखील नव्हती. अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असणारी दुकानेदेखील बंद होती. दुपारनंतर वादळ सरकल्याचे समजताच नागरिकांना सुटके चा नि:श्वास सोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 3:08 am

Web Title: cyclone nisarga low impact on palghar zws 70
Next Stories
1 वेगवान वारे, पावसामुळे मंडणगड, दापोलीत दाणादाण
2 प्रशासनाच्या चुका सहन करणार नाही
3 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस
Just Now!
X