अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ आज अलिबाग जवळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान निसर्ग वादळाचा धसका घेऊन रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे भल्यामोठ्या दोन जहाजांनी मंगळवारी सायंकाळनंतर आसरा घेतला होता. ही दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने जहाज भरकटत जात असल्याचे चित्र मिरकरवाडा, भगवती बंदरात पहायला मिळत आहे.
दरम्यान जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती असून समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागाला जास्त बसण्याची शक्यता असल्यामुळे मंडणगड, गुहागर आणि दापोली या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. ते म्हणाले की, या वादळाचा प्रभाव बुधवारी पहाटेपासून जाणवणार असून सकाळी ९ ते १२ या कालावधीत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी हे वादळ गोवा, सिंधुदुर्गापासून पुढे सरकत होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास ते रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागाकडून अलिबागकडे सरकणार असल्याने परिस्थितीत संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सची (एनडीआरएफ) वीसजणांची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून दापोली येथे, तर दुसरी तुकडी मंडणगडमध्ये ठेवण्यात आली आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी चार बोटी, कटर, लाईट यांसारखे साहित्य या पथकाकडे उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास मत्स्य विभागाच्या सहकार्याने मच्छीमारी नौकांची मदत घेतली जाईल.
वादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली, गुहागर या किनारी भागांना बसू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याचे नमूद करून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, त्या तुलनेत रत्नागिरी आणि राजापूरच्या किनारी भागाला कमी फटका बसेल, अशी अपेक्षा आहे. म्हणून मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वेळास या किनारी भागातील सुमारे १२००, दापोलीतील २३५, तर गुहागरमधील ११९६ लोकांचे स्थलांतर केले आहे. दापोली तालुक्यातील २३ गावे किनाऱ्यावर असून त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
या वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून महावितरण, बंदरविभाग, मत्स्य विभाग, जिल्हा परिषद, पालिकांसह तालुकापातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली आहे. वादळामध्ये जिवीतहानी व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात उद्या दिवसभर संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वी २००९ च्या डिसेंबरात ‘फयान’ वादळाचा फटका रत्नागिरी शहर व जिल्ह्याला बसला होता. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारच्या वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गावपातळीवर मदत करण्यासाठी खासगी संस्थांच्या सदस्यांसह प्रशिक्षित तरुणांना सहभागी करुन घेतले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 11:29 am