काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी

गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या ओखी चक्री वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात थोडे ढगाळ वातावरण असले तरी समुद्र शांत असून वादळाचा फारसा प्रभाव अद्याप जाणवलेला नाही. मात्र जिल्ह्यातील मंडणगड, चिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये सोमवारी संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

गोव्यासह कोकण किनारपट्टीला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्यामुळे  गेल्या शनिवारपासून सर्वत्र दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.या वादळाचा प्रभाव उद्या, मंगळवापर्यंत राहील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण सुदैवाने रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये अजून त्याचा फारसा प्रभाव जाणवलेला नाही. गेल्या रविवारी पौर्णिमा असल्यामुळे मात्र किनाऱ्यावरील अनेक गावांमध्ये उधाणाचे पाणी भरण्याचे प्रकार घडले. त्यामुळे  त्या परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या हातगाडय़ा आणि अन्य काही साहित्य वाहून गेले. पण त्यापेक्षा जास्त नुकसान झालेले नाही.

दरम्यान केरळ, तमिळनाडसह कर्नाटकातील मिळून एकूण ५६ यांत्रिक नौका जिल्ह्यातील जयगड, नाटे, मिऱ्या इत्यादी ठिकाणी आश्रयाला आलेल्या आहेत. तयावरील सुमारे उक हजारापेक्षा जास्त खलाशांना आवश्यक सुविधांसी वैद्यकीय सेवाही जिल्हा प्रशासनातर्फे पुरवण्यात आल्या आहेत.

शाळांना सुट्टी

संभाव्य वादळाच्या पाश्र्वभूमीवर उद्या, मंगळवारी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवस पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, अशी सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.