अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे चक्रीवादळामध्ये परिवर्तित होत असल्याने, पालघर व ठाणे जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून तातडीने माघारी बोलवले आहे.

केंद्र शासनाने 12 सागरी मैलाच्या पलिकडे 15 जून पर्यंत मासेमारी करण्याची मुभा दिली असली तरी, राज्य शासनाने 31 मे पर्यंतच मच्छिमारांना मासेमारी करण्याचे परवाने दिले होते. टाळेबंदी नंतर काही प्रमाणात मासेमारी सुरू करण्यात आली होती व सध्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील 37, सातपाटी येथील 36, एडवण येथील 50, वसई येथील 202 तसेच ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील 130 अशा 455 बोटी समुद्रात मासेमारी करीत आहेत. यामध्ये सुमारे 90 दिवस मासेमारी करणाऱ्या बोटींचाही समावेश आहे.

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात रुपांतरीत होत असल्याने, मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व संबंधित मासेमारी संस्था व मच्छिमारांना निरोप पाठवून, मासेमारी करीत असलेल्या सर्व बोटींना तातडीने माघारी आणण्याची संदेश पाठवले आहेत. या अनुषंगाने या बोटी आज सायंकाळपर्यंत किंवा रात्री उशिरापर्यंत परत येतील, असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अजिंक्य पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व मासेमारी बोटींना 31 मे पर्यंत मासेमारी करण्याचा परवाना देण्यात आला असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले.