वसई : अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीच्या भागात तौते चक्रीवादळ धडकण्याचा इशारा दिला होता. या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे वसईतील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी शनिवारी मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या. रविवारी मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठं मोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात झाली.

या लाटांचा व वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटून गेले. आणि या बोटी किनाऱ्यावर जोराने आदळून गेल्याने बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही एकदिवसीय मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटीही अक्षरशः तुटून त्यांचे दोन तुकडे झाले आहेत. तर काही बोटी एकमेकांवर खडकावर आदळून गेल्याने बोटींना मोठंमोठी छिद्रं पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही बोटींचे इंजिनही निखळून पडले आहे.

अर्नाळा किल्ला परिसरात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहत आहेत. यातील काही मच्छिमार लांबच्या पल्याला मासेमारीसाठी जातात, तर काही बांधव हे आपल्या छोट्या बोटी घेऊन एकदिवसीय मासेमारी जातात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र नुकताच घोंगावलेल्या वादळामुळे अनेकांच्या बोटींचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आधीच करोनाचे संकट आहे. त्यात आता वादळी वाऱ्याचे संकटही उभे ठाकले आहे. या वादळामुळे आमच्या उदरनिर्वाह करण्यासाठीचे महत्वाचे साधनच तुटून फुटून गेल्याने आम्ही मासेमारी तरी कशी करायची? असा प्रश्न मच्छिमार बांधवांनी उपस्थित केला आहे. झालेले नुकसान हे मोठे आहे. एकापाठोपाठ एक अशी संकट येत असल्याने दिवसेंदिवस अडचणी अधिकच वाढू लागल्या आहेत.