अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ सोमवारी पहाटे रायगड किनारपट्टीवरून पुढे सरकरण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने किनारपट्टीवरील भागात कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात संध्याकाळ पर्यंत २ हजार २५४ जणांना निवारा शेड मध्ये हलविण्यात आले होते.

Cyclone Taukate : मालवणच्या किनारपट्टीस तडाखा ; अनेक ठिकाणी पडझड!

या चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यावरी ६२ तर खाडी किनाऱ्यावरील १२८ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटेपासून रायगड पासून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील भागात वादळाचा प्रभाव दिसण्यास सुरवात होईल. किनारपट्टीवरील भागात वादळी वारे वाहतील, काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होईल. समुद्र खवळलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Cyclone Tauktae : मुंबईत उद्या अतिवृष्टी; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. किनारपट्टीवरील गावात कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यास सुरवात झाली आहे. मुरुड तालुक्यातील टेंभुर्ली वाडी, नांदगाव दांडवाडी येथील नागरिकांना टेंभुर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. बोर्ली, एकदरा, राजपूरी येथील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अलिबाग, उरण, महाड आणि श्रीवर्धन तालुक्यातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तसेच कच्च्या घरात राहणाऱ्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

‘तौते’ वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये संचारबंदी!

महामार्गावर जेसीबी आणि वृक्ष छाटणी पथक तैनात –
दरम्यान वादळामुळे जिल्ह्यात झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुक खंडीत होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्ष छाटणी पथके तैनात करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाकडे १०८ वृक्ष छाटणी यंत्र तर पोलीस विभागाकडे २८ वृक्ष छाटणी यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी जेसीबी मशीन तैनात करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्रतिसाद कक्ष –
वादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती प्रतिसाद कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवासी जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कक्ष पुढील २४ तास कार्यरत असणार आहे. कक्षात पंधरा तालुक्यांसाठी १५ जण कार्यरत असणार आहेत. मोबाईल आणि टेलिफोन सेवा खंडीत झाल्यास संपर्कासाठी वायरलेस आणि हॅम रेडीओ सारख्या यंत्रणाही कार्यरत असणार आहेत.