दोन दिवसात रायगडच्‍या वेगवेगळया समुद्रकिनारी एकूण ८ मृतदेह सापडले आहेत. या मृतदेहांची ओळख पटली नसली तरी ते अरबी समुद्रात बुडालेल्‍या पी 305 या तराफ्यावरील बेपत्‍ता खलाशांचे असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

रायगड जिल्ह्यामधील मुरूड समुद्रकिनारी शुक्रवारी रात्री एक मृतदेह सापडला, त्यानंतर आाज दिवसभरात नवगाव किनारी दोन, आवास आणि दिघोडी किनारी प्रत्‍येकी एक मृतदेह आढळून आले. पी 305 या तराफ्यावरील  बेपत्‍ता खलाशांचे वर्णन सांगण्‍यात आले आहे, त्‍याच्‍याशी या मृतदेहांचे वर्णन मिळतेजुळते आहे. त्‍यामुळे हे मृतदेह अरबी समुद्रात बुडालेल्या पी  305 या तराफ्यावरील बेपत्ता कर्मचार्‍याचे असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रामध्ये बुडालेल्या पी 305 या तराफ्यावरील १३ कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. ज्‍या भागात मृतदेह सापडले तो परिसर मुंबईपासून जवळ आहे.  दरम्‍यान रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी याबाबतची माहिती ओएनजीसी व संबंधित तपास यंत्रणांना दिली आहे. याबाबत खात्री करण्‍यासाठी ओएनजीसीचे पथक बेपत्‍ता खलाशांच्‍या नातेवाईकांसह रायगडमध्‍ये येत असल्‍याची माहिती रायगड पोलीसांनी दिली.

अलिबागमधील किहीम समुद्र किनाऱ्यावर तीन मृतदेह सापडले आहे. शनिवारी सकाळपासून आतापर्यंत अलिबागमधील समद्रकिना-यांवर सापडलेल्या मृतदेहांची संख्या आठ वरती पोहचली आहे. यापूर्वी कालपासून मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसभरात पाच मृतदेहांची नोंद झाली आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिवसभरात दोन, तर मुरूड मध्ये एक मृतदेह सापडला. यात आता आणखीन तीन मृतदेहांची भर पडलीय.