कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसराला तडाखा  *  नऊ जणांचा मृत्यू,आठ हजार घरांचे नुकसान  * शेकडो झाडे, विजेचे खांब कोसळले

मुंबई/पुणे : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण करत सोमवारी कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला. कोकणासह मुंबई, ठाण्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले.

चक्रीवादळाने रविवारी केरळ, कर्नाटकसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना तडाखा दिला होता. गुजरातच्या दिशेने जाताना चक्रीवादळाने सोमवारी कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये धुमाकूळ घातला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्य़ांच्या किनारपट्टीवरील घरांचे आणि शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील घरे आणि बागायतींची कोटय़वधी रुपयांची हानी झाली. वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौका वाहून गेल्याने एका खलाशाचा मृत्यू झाला तर आणखी तीनजण बेपत्ता आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या धक्कय़ाने दोघेजण ठार झाले. कोकणात शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. आब्यांच्या बागांनाही फटका बसला.

सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास रायगड किनारपट्टीवर धडकलेल्या चक्रीवादळाने जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला. दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. त्यात पाच हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले असून, वृक्ष उन्मळून पडणे, विद्युत खांब कोसळण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली.

चक्रीवादळामुळे कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते. करोना रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये व झाला असल्यास तात्काळ तो सुरू करावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. रस्त्यावर पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरू राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छीमारांच्या काही बोटींचे नुकसान झाले आहे.

पंतप्रधान-मुख्यमंत्री चर्चा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी किनारपट्टी भागात के लेली तयारी, मुंबईतील परिस्थिती आदींबाबत मोदी यांनी माहिती विचारली. त्यावर ठाकरे यांनी राज्य सरकारने के लेल्या सज्जतेची माहिती दिली आणि राज्य सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

पडझड कुठे?

चक्रीवादळामुळे सुमारे आठ हजार घरांची पडझड झाली. त्यात सिंधुदुर्गातील सुमारे दोन हजार घरे, रत्नागिरीत ६१, रायगड ५२४४, ठाणे जिल्हा २४, पालघर ४,  पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ घरांचे नुकसान झाले.

मनुष्यहानी कुठे?

चक्रीवादळाने नऊ जणांचा बळी घेतला आहे. त्यात सिंधुदुर्गात १, रत्नागिरीत २, रायगडमध्ये चार, उल्हासनगर, नवी मुंबईत प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या चक्रीवादळात अनेकजण जखमी झाले आहेत.

गुजरात किनाऱ्यावर..

’सोमवारी रात्री चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मंगळवारी त्याची तीव्रता कमी होईल.

’गुजरातमध्ये दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात, दीव, दमण, दादरा नगर हवेली आदी भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे.

’१९ मे रोजी त्याची तीव्रता आणखी कमी होऊन कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर होणार आहे. मात्र, या काळात थेट राजस्थानपर्यंत त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

’दक्षिण राजस्थानमध्ये १९ तारखेला जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुजरातमधून सुमारे दोन लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.