News Flash

“बाळासाहेब म्हणाले होते, कोकणसाठी सरकारचे कान पिळेन; आज त्यांच्याच सुपुत्राने तोंडाला पानं पुसली”

"आज बाळासाहेब असते, तर त्यांना काय वाटले असते?"

पहिल्याच पावसात मुंबईसह उपनगरांतील विविध भागात पाणी साचलं. तर काही ठिकाणी इमारत दुर्घटना घडल्या... या मुद्द्यावरून भाजपाने शिवसेनेवर टीकास्त्र डागलं. (संग्रहित छायाचित्र)

गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळातून सावरणाऱ्या कोकणला यंदाही चक्रीवादळाचा तडाखा बसला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाने गुजरातकडे जाताना कोकणात प्रचंड नासधुस केली. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, आता मदत देण्याची ओरड होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणचा दौरा केला. पंचनामे होताच मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यंत्र्यांच्या या घोषणेवरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावर आणि त्यांच्या घोषणेवर टीका केली आहे. केशव उपाध्य यांनी काही ट्विट्स केले आहेत. “कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?,” असा सवाल उपाध्ये यांनी शिवसेनेला केला आहे.

“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली. गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केलं होतं. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की,” असा इशारा केशव उपाध्ये यांनी दिला आहे.

कर्ज घ्या, पण भरीव मदत करा -नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणमधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना पटोले यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना भरीव मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. “कोकणात खूप मोठं नुकसान झालं आहे. कोकणातील लोकांना पुन्हा उभं करायला हवं. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं, तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असं आवाहन पटोले यांनी दौऱ्यादरम्यान ठाकरे सरकारला केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 2:32 pm

Web Title: cyclone tauktae letest news cm uddhav thackeray balasaheb thackeray keshav upadhye cyclone hits kokan bmh 90
Next Stories
1 कटूपणा घेण्याची माझी तयारी; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाउनबद्दल सूचक विधान
2 तिसऱ्या लाटेतही लहान मुलांमधील करोना कसा रोखणार?; मुख्यमंत्र्यांनी साधला टास्क फोर्सशी संवाद!
3 भूकंप! पश्चिम महाराष्ट्रात सकाळी ९.१६ वाजता जाणवले धक्के!
Just Now!
X