तौते चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तुफान वारा आणि पावसामुळे अनेकांच्या डोक्यावरील छप्पर उडालं असून प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. पुन्हा एकदा नव्याने सर्व काही उभं करण्याचं आवाहन अनेकांसमोर आहेत. आधीच करोना संकटामुळे आर्थिक स्थिती वाईट असताना त्यात वादळाने केलेल्या नुकसानामुळे अनेकांसमोर संकटाचा डोंगर उभा आहे. यामध्ये वसईतील एका वृद्धाश्रमाचाही समावेश आहे. याच वृद्धाश्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका वास्तव्यास असून त्यांनी मदतीसाठी आर्त हाक दिली आहे.

९० वर्षीय सुमन रणदिवे दादरमधील बालमोहन विद्यामंदिरात शिक्षिका होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांनी शिकवलं आहे. १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. पतीच्या आणि मुलाच्या निधनानंतर सुमन रणदिवे यांनी वृद्धाश्रमात आश्रय घेतला. वसईतील सत्पाळा गावातील “न्यू लाईफ केअर” या वृद्धाश्रमात त्या राहत आहेत.

आणखी वाचा- “पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, विरोधकांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

सुमन रणदिवे यांच्यासोबत वृद्धाश्रमात २५ हून अधिक वृद्ध राहतात. तौते चक्रीवादळामुळे असलेल्या वृद्धाश्रमाचे पत्रे उडाले असून इतरही नुकसान झालं आहे. पत्रे उडून गेल्यामुळे सर्व सामान, कपडे, कागदपत्रंही भिजली असून सर्वांवर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. वादळ जाऊन दहा दिवस झाल्यानंतरही अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे सुमन रणदिवे यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली आहे.

आणखी वाचा- “मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे नौटंकी दौरा”, नारायण राणेंचा घणाघाती प्रहार

“चक्रीवादळामुळे वृद्धाश्रमाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. छप्पर उडालं असल्याने आम्हाला रात्री झोपायला त्रास होतो. उद्धव बेटा मला तुला भेटायचं आहे. तू शिवाजी पार्कमध्ये शाळेत असताना मी शिकवलं होतं. कृपया आम्हाला मदत कर”, अशी आर्त हाक सुमन रणदिवे यांनी दिली आहे. दरम्यान वृद्धाश्रमाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास आठ ते दहा लाखांचं नुकसान झालं आहे.

आधीच करोनाचं संकट असताना त्यात तौते चक्रीवादळामुळे डोक्यावर छप्पर नसल्याने सध्या हे सर्व वृद्ध अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. वेळीच मदत मिळावी अशी अपेक्षा ते व्यक्त करत असून पावसाळ्याआधी सर्व काही पुन्हा ठीक व्हावं अशी आशा करत आहेत.