भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या वादळाचे चक्रीवादळात रुपांतर झालं असून, हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मच्छिमारांना १४ ते १६ मे दरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, शासनाच्या निर्देशाकडून दुर्लक्ष करून जिल्ह्यातील २१० बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सर्व बोटींना तात्काळ किनाऱ्यावर येण्याचे निर्देश मत्सव्यवसाय विभागाकडून देण्यात आले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या दिलेल्या इशार्‍यानुसार १४ जानेवारीला ४० ते ५० किमी वेगाने, १५ तारखेला ताशी ४० ते ६० तसेच १६ तारखेला ताशी ६० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्‍यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, समुद्र व खाडी किनार्‍यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र वादळाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून रायगड जिल्ह्यातील अनेक मासेमारी नौका समुद्रात गेल्याची बाब समोर आली आहे.

जिल्ह्यातील १३ मे पूर्वी १५४ मच्छीमार नौका मासेमारीसाठी गेल्या होत्या. १४ मे रोजी आणखीन १७१ बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या. यात प्रामुख्याने अलिबाग तालुक्यातील बोटींचा समावेश आहे. समुद्रात गेलेल्या ३२५ मासेमारी बोटींपैकी २२९ बोटी परत आल्या आहेत. तर अद्यापही ९६ बोटी समुद्रात आहेत. या सर्व बोटींना किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात अलिबाग मधील ९२, उरण मधील ०४ मच्छिमार नौकांचा समावेश आहे. उद्यापासून तीन दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व मच्छीमार संस्थांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत या बोटी परत येतील, अशी माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुरेश भारती यांनी दिली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने वादळाचा इशारा देऊनही बोटी समुद्रात कशा गेल्या हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.