16 November 2019

News Flash

कोकणावर ‘वायू’चे सावट

गुजरातच्या किनारपट्टीवर आज चक्रीवादळ धडकणार

गुजरातच्या किनारपट्टीवर आज चक्रीवादळ धडकणार

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ानंतर निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीवादळाचा वेग गुरुवारी ताशी १४५ ते १५५ किलोमीटरदरम्यान होणार असल्याने राज्याच्या किनापट्टीवर प्रामुख्याने कोकण, मुंबईत त्याचा परिणाम होऊ शकतो. कोकण विभागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

वायू चक्रीवादळ बुधवारी मुंबईपासून पश्चिम- दक्षिणमध्ये २९० किलोमीटर अंतरावर होते. गोव्याच्या उत्तर- पश्चिम भागापासून ४६० किलोमीटर, तर गुजरातच्या वेरावळपासून ३२० किलोमीटर अंतरावर होते. चक्रीवादळ प्रामुख्याने उत्तरेच्या दिशेने पुढे जाणार असून, वेरावळच्या पश्चिम दिशेने पोरबंदर आणि दीवच्या मध्ये ते गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या चक्रीवादळातील हवेचा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर असला, तरी हळूहळू तो वाढत जाणार आहे. १३ जूनला सकाळी ताशी १४५ ते १५५ किंवा १७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस पडत आहे. कोकणात आणि मुंबईत बुधवारीही पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकत असताना राज्यातील किनारपट्टीवरही वेगाने वारे वाहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. १३ ते १६ जून या कालावधीतही कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर ६.९ मीटपर्यंत उंचीच्या लाटा

‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी वायव्येला सरकले असून राज्याच्या किनारपट्टीवर मोठय़ा उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी रात्री ११.३० पर्यंत वसई ते मालवण या किनारपट्टीवर ३.५ ते ६.९ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पुढील दोन दिवसांच्या काळात समुद्र खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील दोन दिवस पालघर, ठाणे, मुंबई या भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

रायगडमध्ये जोरदार पाऊस

रायगड जिल्ह्यत बुधवारी जोरदार पाऊस झाला. वायू वादळाचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसला नसला तरी त्याचे परिणाम मात्र किनारपट्टीवरील भागांत बुधवारी दिसून आले. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातील समुद्र किनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली, तर पर्यटकांनाही समुद्रात उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, सखल भागात पाणी साचणे यासारख्या घटनाही घडल्या. येत्या २४ तासांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गुजरातमध्ये १.६० लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

वायू चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावरील सुमारे १.६० लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील बंदर आणि विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. चक्रीवादळाच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेने १५ गाडय़ा रद्द केल्या आहेत.

First Published on June 13, 2019 12:34 am

Web Title: cyclone vayu in india