अभिमत दर्जा असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयांवर गेल्या आठवड्यात प्राप्तिकर विभागाने छापा टाकला होता. यात ३० कोटी रुपये आणि ४० किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. याशिवाय प्राप्तिकर विभागाने काही कागदपत्रे, बँकांची खाती आणि स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि दागिने मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. डी. वाय. पाटील संस्थेची इतर अनेक खातीही सील करण्यात आली आहेत.’
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शिक्षण संस्था या ‘ना लाभ ना तोटा’ या तत्त्वावर चालवले गेले पाहिजेत. कॉलेजमध्ये दाखला घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच किंवा देणगी घेणे अयोग्य आहे.
वैद्यकीय व अभियांत्रिक महाविद्यालयांतील कागदपत्रांची कसून छाननी सुरू होती. मात्र याचा तपशील सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला.
पिंपरी व आकुर्डी परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे येतात. अवाच्या सवा देणग्यांवरून कायम चर्चेत राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचे संत तुकारामनगर येथे दंत वैद्यकीय महाविद्यालयही आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मुख्य कार्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाले, तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त होता. सुमारे १०० तास या ठिकाणी तपास मोहीम सुरू होती.
पिंपरीत जानेवारीमध्ये झालेल्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे आयोजकपद डॉ. डी. वाय. पाटील संस्थेकडेच होते. आतापर्यंत झालेल्या संमेलनांपैकी सर्वाधिक खर्चाचे संमेलन म्हणून पिंपरीच्या संमेलनाकडे पाहिले जाते. पैशाच्या उधळपट्टीवरून संमेलनावर खूपच टीका झाली होती, तेव्हा महिन्याभरानंतर अधिकृत खर्चाचे आकडे जाहीर करू, अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. तथापि, अजूनही त्या खर्चाचा हिशेब संस्थेने जाहीर केला नाही. याशिवाय, संस्थेकडे पिंपरी पालिकेच्या मिळकतींची मोठी थकबाकी आहे. तथापि, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एका प्रकरणात ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. तर संस्थेच्या नियोजित आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या जागेची अडीच कोटींची थकबाकी पालिकेने नुकतीच दंडासह वसूल केली. त्यापाठोपाठ आयकर विभागाने छापासत्र सुरू केल्याने संस्थेचा ‘कारभार’ पुन्हा चर्चेत आला आहे.
पिंपरीप्रमाणेच डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या कोल्हापूर आणि नवी मुंबई येथील कार्यालयांवरही प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला. काही प्रमुख अधिकाऱ्यांची नंतर दोन तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली असून त्याची तपासणी सुरू होती.