डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करताना आरोपींनी पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर गुन्ह्य़ाची वेळ, निवडलेले ठिकाण ही गुन्ह्य़ाची पद्धत पाहता डॉ. दाभोलकर यांची हत्या सुपारी देऊनच केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे. पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस धागेदारे मिळालेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. दाभोलकर यांचे पुत्र हमीद आणि मुलगी मुक्ता यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. डॉक्टरांना कोणाची धमकी आली होती का याबाबत दोघांकडे माहिती घेतली आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी पुण्यातील दोनशे आणि राज्यातील सातशे सराईत गुन्हेगारांकडे आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या ७७५६ या क्रमांकाच्या ७४ दुचाकी तपासल्या आहेत. ओंकारेश्वर मंदिराजवळील ११० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण गोळा झाले असून त्यातील पन्नास ठिकाणचे चित्रीकरण पाहून झाले आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या ९६ जणांकडे चौकशी करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी बनावट नंबर प्लेट वापरली असल्याची शक्यता गृहित धरून पुण्यातील नंबर प्लेट  बनविणाऱ्या ६८ जणांकडे चौकशी करण्यात आली आहे.
फरारी शार्पशूटर्सचा शोध
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी राज्यातील विविध तुरुंगातील सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना, राज्यातील कारागृहातून संचित रजेवर (पॅरोल) सुटलेले सुमारे दोनशे कैदी फरारी झाल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली आहे. फरारी कैद्यांत महत्त्वाच्या सराईत गुन्हेगार व ‘शार्प शूटर’चा समावेश आहे. त्यामुळे दाभोलकर हत्येचा तपास करताना या फरारी कैद्यांमधील २५ ते ३० वयोगटातील सराईत गुन्हेगांराचा शोध घेतला जात आहे.दाभोलकर हत्या तपासावरून मुख्यमंत्री-गृहमंत्री विसंवाद
खास प्रतिनिधी, मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला असतानाच या प्रकरणी अद्याप ठोस असे कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी यांनी सांगितल्याने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे समोर आले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाचा आपण आढावा घेतला असता त्यात कोणतेही ठोस धागेदोरे हात लागलेले नाहीत, अशी माहिती देण्यात आली. सध्या पोलिसांची २० पथके डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत असून, विविध अंगाने तपास करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. तपासात ठोस धागेदोरे सापडलेले नाहीत, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली असतानाच, आर. आर. पाटील यांनी मात्र तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा निर्वाळा गेल्या आठवडय़ातच दिला होता. शिवाय, आरोपींना पकडण्यात लवकरच यश येईल, असा विश्वासही पाटील यांनी तेव्हा व्यक्त केला होता.
मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा खटला नवी दिल्लीतील घटनेनुसार रेंगाळू नये, अशी राज्य शासनाची अपेक्षा आहे. या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची शासकीय वकील म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. लवकरात लवकर पोलिसांनी आरोपपत्र सादर करावे आणि या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या बदल्यांवरून मतभेद
पोलिसांच्या बदल्या या संवेदनशील मुद्दय़ावरून सरकारमध्ये सहमती होऊ शकली नाही, अशी कबुली मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली. प्रकाशसिंग विरुद्ध केंद्र सरकार खटल्यात पोलिसांच्या बदल्यांसाठी स्वतंत्र मंडळ असावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. महाराष्ट्र सरकारने या आदेशाचे पालन न केल्याने न्यायालयाच्या बदनामीचा नोटीस बजाविण्यात आली होती. मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला होता. यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. यामुळेच घाईगडबडीत बदल्या केल्या जाणार नाही, असे सूचित मुख्यमंत्र्यांनी केले.