हिरे घराण्याच्या रूपाने राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीपासून राज्य विधिमंडळात प्रदीर्घ काळ मंत्रिपदाचा मान मिळविणाऱ्या मालेगावची गेल्या दहा वर्षांपासून मंत्रिपदाची परंपरा खंडित झाली होती. परंतु मालेगाव बाह्यचे दादा भुसे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मंत्रिपदाची ही परंपरा पुन्हा बहाल झाली आहे. दहा वर्षांच्या खंडानंतर आणि अत्यंत अनिश्चिततेच्या स्थितीत मिळालेल्या या मंत्रिपदामुळे मालेगावात विशेषत: शिवसेनेच्या छावणीत आनंदोत्सव सुरू झाला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब हिरेंपासून मालेगावला मंत्रिपद लाभण्याची परंपरा लाभली. भाऊसाहेबांनंतर काँग्रेसी परंपरेतील हिरे घराण्यातील व्यंकटराव हिरे, डॉ. बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे यांनी मंत्रिपदे भूषविली होती. पुलोदच्या काळात समाजवादी नेते निहाल अहमद यांनीही मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. सतत मंत्रिपदे पटकावणाऱ्या हिरे घराण्याने नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करीत असताना प्रदीर्घ काळापर्यंत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी पेलली आहे. अशा रीतीने कायम मंत्रिपद मिळविणाऱ्या मालेगावची १९९५ मध्ये युतीची सत्ता आली तेव्हा मात्र साडेचार वर्षे मंत्रिपदाची पाटी कोरी राहिली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या आघाडी शासनात प्रशांत हिरे यांना काही काळ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. परंतु नंतर राज्यात आघाडीचे शासन कायम राहिले तरी प्रशांत हिरेंना सतत दोनदा पराभव पत्कारावा लागल्याने मंत्रिपदाची संधी हुकली होती. त्यामुळे कायम मंत्रिपद मिरविणाऱ्या मालेगावला पहिल्यांदाच मंत्रिपदाविना दहा वर्षे एवढा काळ घालवावा लागला होता. आता राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेले भुसे हे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. बलाढय़ हिरे घराण्याला धूळ चारणाऱ्याची अफलातून किमया त्यांनी करून दाखवली. त्यामुळे जर युती सत्तेत आली आणि भुसे तिसऱ्यांदा विजयी झाले तर त्यांना हमखास मंत्रिपद मिळेल, असा कयास सेना-भाजप युती तुटण्याच्या आधी लावला जात होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती तुटल्याने त्याविषयी काहीशी अनिश्चितता निर्माण झाली. त्यानंतर निवडणूक झाल्यावर ही युती होईल व भुसेंना मंत्रिपद मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली गेली. मात्र या दोन्ही पक्षांत एकमत होत नसल्याने त्यांच्या समर्थकांमधील घालमेल वाढीस लागत होती. अखेरीस दोन दिवसांपूर्वी युतीवर शिक्कामोर्तब झाले तरी सेनेच्या वाटय़ाला येणारी मर्यादित मंत्रिपदे व इच्छुकांची अधिक संख्या यामुळे भुसेंना राज्यमंत्रिपद तरी मिळेल की नाही याविषयी पुन्हा संभ्रम निर्माण झाला. मात्र ‘मातोश्री’वरून राज्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव नक्की झाल्याची माहिती गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथे आल्याने फटाक्यांची एकच आतषबाजी सुरू झाली. आपल्या नेत्याच्या शपथविधी सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मग रात्रीच अनेक कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दूरचित्रवाणीवरून प्रत्यक्षात त्यांचा शपथविधी बघितल्यावर शहर व तालुक्यात पुन्हा फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू झाली.
भुसे यांना कोणतीही राजकीय पाश्र्वभूमी नाही. स्वातंत्र्यसैनिक दगडू बयाजी भुसे यांचे सुपुत्र अशी त्यांची ओळख. स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका मिळविल्यावर काही काळ त्यांनी पाटबंधारे खात्यात नोकरी केली. नंतर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन जाणता राजा या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मालेगावातून समाजकार्य सुरू केले. कालांतराने हिंदू नेता अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष विजयी झालेले भुसे सेनेत दाखल झाले. पुढे २००९ च्या निवडणुकीत ही जागा कायम राखण्यात ते यशस्वी झाले होते. तिसऱ्यांदा विजय मिळवताना त्यांनी ३७ हजार मतांची घसघशीत अशी आघाडी घेतली.