नगर जिल्ह्य़ाने चित्रपट क्षेत्रात अनेक दिग्गज कलावंत दिले. कै. दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट व्यवसायात जिल्हा यापुढेही असेच योगदान देईल, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके यांनी व्यक्त केली.
महामंडळ व नगरी सिनेमा यांच्या वतीने शुक्रवारपासून तीन दिवस स्व. शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सव येथील महेश चित्रपटगृहात आायोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर होते. महामंडळाच्या वतीने यावेळी २५ हजार रुपयांचा धनादेश महोत्सवासाठी नगरी सिनेमाकडे सुपूर्द करण्यात आला.
कलावंत अनिल पाटोळे यांनी दादा कोंडके यांची भूमिका सादर करुन उपस्थितांचे मनोरंजन केले. दिलीप दळवी, अतुल ओहोळ यांची भाषणे झाली. भगवान राऊत यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी नगरी सिनेमाची संकल्पना स्पष्ट केली. सतीश बिडकर, रामेश्वर मणियार, माजी महापौर भगवान फुलसौंदर, डॉ. संजय कळमकर, रिता जाधव-राठोड आदी उपस्थित होते. मानसी आडेप व तनिष्का मंगलारव यांनी गणेश वंदना केली. उमेश घेवरेकर यांनी सूत्रसंचलन केले. राज भालेराव यांनी आभार मानले.