दर्शनावरही बंदी; दुकानदार, स्थानिक विक्रेते आर्थिक संकटात

डहाणू :  करोना साथीच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी चैत्र पौर्णिमेला भरणारी डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा जिल्हा प्रशासनाने यंदाही रद्द केली आहे. यामुळे दुकानदार, स्थानिक विक्रेते आर्थिक संकटात सापडले आहेत. करोनामुळे कडक निर्बंध असल्याने महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठीही बंद ठेवण्यात आले आहे. कोणीही मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

विव्हळवेढे महालक्ष्मी ग्रामपंचयातीकडून दुकाने व मुख्य प्रवेशस्थानावर ठिकठिकाणी फलक लावण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक सुनील गायकवाड यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेदरम्यान देवीच्या दर्शनासाठी ठाणे, मुंबई, पालघर, पुणे, तसेच दादरा नगर हवेली, गुजरात राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेतून पावसाळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करत असतात. जवळजवळ १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेमुळे लाखोंची उलाढाल होत असते.  करोनामुळे दुसऱ्यांदा यात्रा रद्द करण्यात आल्याने यात्रेवर अवलंबून असणारे जागा मालक, पाळणे, ताडगोळे विक्रेते, मासळी विक्रेते, खेळणी विक्रेते, मासळी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, हार फुल, पेढे दुकानदार यांच्यासमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

यात्रेमध्ये जंगलातील फळे, फुले, बियांपासून ताडगोळे तसेच साहित्य विक्री केले जाते. यात्रेदरम्यान आजूबाजूच्या गावातील नागरिक पावसाळ्यासाठी अगोटची खरेदी, शेतीची अवजारे, मासे पकडण्याची जाळी, तसेच लोखंडी अवजारे तसेच कांदे, बटाटे, लसून, मीठ, मसाल्याचे पदार्थ काचेच्या बांगडय़ांपासून ते संसारोपयोगी वस्तू खरेदी करीत असतात.

महालक्ष्मी यात्रा म्हणजे खवय्यासांठी पर्वणी असते. खवय्ये चिकन, मटण, भूजिंग, मच्छीवर ताव मारतात.  कोंबडय़ा, बोकड, मासळीचे  सुकवलेले खारे, सुकी मासळी यांची विक्री केली जाते. मनोरंजनाच्या साधनामध्ये जम्बो व्हील, मौत का कुआ, आकाश पाळणे, सर्कस ,म्युझिक शो ,जादूचे प्रयोग इ. साधने आकर्षण ठरते. काचेच्या, लाकडी, स्टील फायबर वस्तू तसेच घर सजावटीच्या वस्तूची, पुजेच्या, प्रसादाच्या दुकानांनी जत्रा फुललेली असते. यात्रेदरम्यान लाखो भाविकांमुळे कोटय़वधीची उलाढाल होते. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असतो.