डहाणूच्या थर्मल पॉवर, इराणी रस्त्यावर रहिवासी, वाहनचालक त्रस्त

डहाणू : डहाणू शहरातील लोणीपाडा – इराणी रोड हा मुख्य रहदारीचा रस्ता अडवून फेरीवाल्यांनी हातगाड्या लावल्याने डहाणूकरांना रस्त्यातून मार्ग काढणे अवघड झाले आहे. तर डहाणू स्थानकाहून इराणी रोडकडे जाताना संपूर्ण रस्त्यावर हातगाड्या थाटल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या भाजी मंडईमध्ये ग्राहक न जाता रस्त्यावरील हातगाड्यांवरून भाजी खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

थर्मल पॉवर रोड आणि इराणी रोडवर भाजी, फळे विकणाऱ्या फेरीवाल्यांनी थेट गाड्या थाटून रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूकदार आणि रहिवाशांना दररोजच्या भांडणाला तोंड द्यावे लागत आहे. रिलायन्स थर्मल पॉवर या प्रकल्पाकडे जाण्यासाठी लोणी पाडा येथूनच एकमेव मार्ग आहे. तर डहाणू पोलीस स्टेशनच्या संरक्षक भिंतीच्या सभोवती हातगाडींनी विळखा घातला आहे.

डहाणू पोलीस चौकीच्या पाठीमागे डहाणू नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी महात्मा गांधी भाजी मार्केट ही ५२ गाळयांची स्वतंत्र इमारत उभारून भाजी विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजी विक्रेत्यांनी स्वत:च्या मनमानीने बाजाराच्या इमारतीत न बसता मुख्य रहदारीच्या रस्त्यावर जागा अडवून बेकायदा गाड्या थाटून अतिक्रमण केले आहे. डहाणू पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील अतिक्रमणाला नगर परिषदेचे उदासीन धोरणच कारणीभूत असून डहाणूतील विक्रेत्यांचा जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात अपयशी ठरला आहे.

थर्मल पॉवर रोड, पोलीस ठाण्याच्या आजूबाजूचा परिसर आणि इराणी रोड या भागात भाजी विक्रेत्यांनी जागेअभावी थेट रस्त्यावर उतरून दुकाने थाटल्याने वाहतूक आणि रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मुख्य रस्त्यावरच फेरीवाल्यांनी गाड्या थाटल्याने पालिकेचा रस्ताच गायब झालेला आहे.

एकीकडे जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांतून वाट काढण्याची कसरत करावी लागत असतानाच फेरीवाल्यांनी रहिवाशांचा ये-जा करण्याचा मार्ग अडकला आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांना अडथळा निर्माण झाला असून दररोजच्या भांडणांनी लोक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील हातगाड्यांची अतिक्रमणे दूर करून नगर परिषदेने यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत नगर परिषदेचे नियोजन सुरू आहे. लवकरच त्यामध्ये बदल दिसून येईल. अशी माहिती मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिली.