दहीहंडीला खेळ म्हणून मान्यता देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा शालेय शिक्षण तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
दहीहंडी उत्सवाला खेळ म्हणून मान्यता देऊ, राज्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठ व्हावे, यासाठी प्रयत्न केला जाईल. २१ जून जागतिक योग दिवस म्हणून साऱ्या जगात साजरा केला जाणार आहे. राज्यातही यानिमत्ताने कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, त्यासाठी एक समिती तयार केली जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. राज्यातील क्रीडा संकुलासंबंधी छगन भुजबळ, रवी राणा, आशिष शेलार, संजय सावकारे, किशोर पाटील, विलास तरे, राणा जगजितसिंह पाटील, उन्मेश पाटील, क्षितीज ठाकूर, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, जितेंद्र आव्हाड, शंभुराज देसाई, विजय वडेट्टीवार, पंकज भुजबळ, चरण वाघमारे, गोपालदास अग्रवाल, धनंजय गाडगीळ व इतर सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
राज्यातील विभागीय क्रीडा संकुले असणाऱ्या शहरांमध्ये जिल्हा क्रीडा संकुलांना मान्यता देणे तसेच तालुक्याच्या ठिकाणी ३८१ तालुका क्रीडा संकुलापैकी २७७ तालुक्यांमध्ये भूखंड उपलब्ध होऊनही केवळ १५ क्रीडा संकुले सुरू झाली. १४७ क्रीडा संकुलांची कामे प्रगतीपथावर असून उर्वरित ११५ तालुक्यातील कामाला सुरुवात झाली नाही. १०४ तालुक्यांमध्ये संकुलांसाठी जागाच मिळू शकलेली नाही. पालघरमध्ये जिल्हा क्रीडा संकुलाचा आराखडा तयार आहे काय, नाशिक, अंजनगाव बारी, भातकुली, पाचोरा, चाळीसगाव, लोहारा, वाशी, परांडा येथील क्रीडा संकुलांचे बांधकाम प्रलंबित आहे काय? आदी हे प्रश्न होते.
विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना तावडे म्हणाले, ३८१ तालुका क्रीडा संकुलांपैकी २७८ तालुक्यांमध्ये भूखंड उपलब्ध आहेत. त्यापैकी २६ क्रीडा संकुले पूर्ण झाली असून १६९ संकुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. ८३ तालुक्यातील कामे तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे सुरू होऊ शकलेली नाहीत. १०३ तालुक्यांमध्ये जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जागा उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी महाविद्यालये व क्रीडा संस्था पुढे आल्यास काळजी वाहक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यासंबंधी धोरण आखावे लागणार आहे. केवळ क्रीडा संकुले मागू नका तर स्वत:च्या निधीतून खेळाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी खर्च करायला हवा. मुंबईत २४ क्रीडा संकुलांना याआधीच्या शासनाने मान्यता दिली आहे. त्याऐवजी ४ क्रीडा संकुले तयार केली तर त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाऊ शकते.