ग्राहकांपेक्षा विनाकारण फिरणारेच अधिक

नगर : शहराच्या बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आज, सोमवारपासून पुन्हा सुरू झाले. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिक, कामगार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पहिल्या दिवशी पावसाळी वातावरणामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची फारशी वर्दळ नसली तरी मोकाट फिरणाऱ्यांचीच अधिक वर्दळ जाणवली.

रस्त्यांवर विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरल्या होत्या. एसटी महामंडळाने बस सुरू केल्या, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद नव्हता. व्यवहार सुरळीत होण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे. मात्र समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची गर्दी दिसली.

करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील बाजारपेठा, दुकाने, खाजगी अस्थापना, बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. नगर जिल्ह्यतील करोना संसर्गाचे प्रमाण ५ टक्केपेक्षा कमी व प्राणवायूच्या एकूण खाटांवरील रुग्णसंख्या २५ टक्?क्?यांपेक्षा कमी आढळल्याने राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्ी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘ब्रेक दी चेन‘ अंतर्गत व्यवहार खुले करण्यास परवानगी दिली. त्यामुळे आज नेहमीच्या वेळेपेक्षा अधिक लवकर सकाळी ९ च्या सुमारासच बाजारपेठेतील दुकाने उघडली. तत्पूर्वी काल दिवसभर तसेच आज सकाळीही व्यावसायिकांनी आपल्या दुकानांची साफसफाई, र्निजतुकीकरण करून घेतले. व्यवहार खुले झाल्याने नागरिकांनीही रस्त्यावर धाव घेतली होती.

कापड बाजार, सराफ बाजार, गंज बाजार, सर्जेपुरा, चितळे रस्ता, दिल्लीगेट, सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक, पाईपलाईन रस्ता येथे अधिक वर्दळ जाणवत होती. मात्र ही वर्दळ ग्राहकांपेक्षा बाजारपेठेतून मोकाट फिरणाऱ्यांचीच अधिक होती. जीवनावश्यक वस्तूंची, ठोक विक्री करणारी आडते बाजार, दाळ मंडईतील भुसार मालाची दुकाने पाच दिवसांपूर्वीच सुरू झालेली आहेत.

एसटी महामंडळानेही बसेस सुरू केल्या, मात्र फेऱ्यांची संख्या कमी होती. प्रवाशांचा प्रतिसादही कमी होता, शहरातील जुने बसस्थानक, पुणे बसस्थानक व तारकपूर या बसस्थानकामध्ये तुरळक प्रवासी दिसत होते.

रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते, पथारीवाले यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रस्त्यावर अपेक्षित गर्दी जाणवत होती. व्यवहार सुरळीत होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल असे व्यावसायिकांचे म्हणणे होते. मात्र असे असले तरी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके याच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रातून गर्दी केली होती. ग्रामीण भागातून आलेल्या अनेकजणांनी मुख्यपट्टीचा वापर केलेला आढळत नव्हता.

गेल्या वर्षीचे तीन महिने व यंदाचे दोन महिने व्यावसायिकांसाठी मोठय़ा नुकसानीचे ठरले आहेत. या कालावधीतच लग्न समारंभ, शालेय साहित्य व गणवेश, रमजान ईद यासारखे मोठे खरेदी होणारे हंगामच ताळेबंदीत अडकले होते. या कालावधीतच ग्राहक मोठी खरेदी करत असतात. त्यामुळेच व्यावसायिकांसाठी या दोन्ही टाळेबंदी नुकसानीच्या ठरल्याने सरकारने व्यवसायिकांना जीएसटीमध्ये काही प्रमाणात सवलत द्यायला हवी. आता व्यापाऱ्यांसाठी केवळ चार महिन्यानंतर येणाऱ्या दिवाळीचा कालावधी हाती राहिला आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यास काही दिवसाचा कालावधी लागेल. आज पहिल्या दिवशी किरकोळ खरेदी करणारे अपवादात्मक ग्राहक होते.

किरण व्होरा, सचिव, एम.जी. रस्ता व्यापारी संघटना.

राज्य सरकारने नगर शहरातील सर्व व्यवहार एकदम खुले केले, हे धोकादायक वाटते. त्याऐवजी टप्प्याटप्प्याने, वेळेचे बंधन टाकत व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी होती. एकदम सर्व व्यवहार खुले झाल्याने त्याचा परिणाम संसर्ग वाढीमध्ये दिसू नये हीच अपेक्षा आहे. आज पहिल्या दिवशी बाजारपेठेत ग्राहकांपेक्षा रस्त्यावर विनाकारण फिरणारे अधिक दिसत होते.

—प्रवीण बोरा, व्यवसायिक, नगर