02 March 2021

News Flash

जगभरातील दुग्धव्यवसाय संकटात

गभरात दुधाचा सुकाळ झाला असून अतिरिक्त दुधाची भुकटी करणे भाग पडत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दूध भुकटीचा अतिरिक्त साठा; राज्याचे ५०० कोटींचे नुकसान 

कोल्हापूर : जगभरात दुधाचा सुकाळ झाला असून अतिरिक्त दुधाची भुकटी करणे भाग पडत आहे. गरजेपेक्षा दुधाची भुकटी खूपच अधिक झाल्याने दरात प्रचंड घसरण झाली आहे. भुकटीचा महापूर झाल्याने भारतातील आणि महाराष्ट्रातील सशक्त दूध संघही आर्थिक कुपोषणाच्या गर्तेत सापडले आहेत. जगात पाच लाख टन, देशात तीन लाख टन आणि महाराष्ट्रात ४० हजार टन भुकटीचा साठा पडून आहे. आणखी दोन वर्षे भुकटीच्या साठय़ाचा ससेमिरा मागे राहणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला असल्याने दूध संघाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. एका महाराष्ट्राचेच ५०० कोटी रुपये नुकसान असून दिवसेंदिवस हा आकडा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे .

भारत जागतिक दुग्धउत्पादनातील प्रमुख देश आहे. मागील दोन दशकांपासून जागतिक पातळीवर भारत दूध उत्पादनात प्रथमस्थानी कायम आहे. देशातील दुग्ध उत्पादन ६०च्या दशकातील १७. २२ दशलक्ष टनांवरून २०१६-१७ मध्ये १६५.४ दशलक्ष टन अशा विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचले आहे. तर मागील तीन वर्षांत देशातील दुग्धउत्पादनात प्रति वर्षी ६.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ जागतिक दुग्धउत्पादनातील प्रतिवर्षी होत असलेल्या वाढीच्या तिपटीने अधिक आहे. मागणीपेक्षा हे प्रमाण किती तरी अधिक आहे. यामुळे दूध संघांना अतिरिक्त दुधाची भुकटी करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. हे चित्र जगभर आहे.

जगाला अतिरिक्त भुकटीने ग्रासले 

दुधाच्या भुकटीचा साठा वाढत जाऊन आता तो पाच लाख टनांपर्यंत गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया खंडांतील देशांचा समावेश आहे. अतोनात साठा  झाल्याने त्याचे दरही कमालीचे घसरले आहेत. भारतातही हीच अवस्था आहे. देशात तीन लाख ५० हजार टन भुकटीचा साठा पडून आहे. त्याची किंमत २५० कोटी रुपये आहे. २२० रुपये किलो असणारा भुकटीचा दर १३५ रुपयांपर्यंत खालावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा दर १०५ रुपये आहे. दर कमी करून विक्री करायची म्हटले तरी ग्राहक उपलब्ध नाही. देशातील साखर उद्य्ोगाप्रमाणेच भुकटीची परिस्थिती झाली आहे.

अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेचे दर घसरले तरीही ग्राहक – मागणी नसल्याने साखर कारखानदारी संकटात सापडली आहे. हीच स्थिती भुकटीमुळे दूध संघावर उद्भवली आहे. राज्यातसुद्धा दुधाचा प्रश्न गंभीर होण्यास अतिरिक्त दूध कारणीभूत ठरले आहे.

राज्यात दोन कोटी ५२ हजार लिटर दुधाची निर्मिती होते. त्यात सहकार क्षेत्राचा वाटा एक कोटी लिटर असून उर्वरित खासगी आहे.

भुकटीमध्ये प्रतिकिलो २० ते ८० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. आधीच, शासनाने घोषित केलेला दूध दर उत्पादकांना देणार नसाल तर सहकारी दूध संघ बरखास्त करण्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे. त्यात या नव्या संकटाची भर पडली आहे .

सहकारी संघ तोटय़ात

दूध भुकटीचे अतिरिक्त उत्पादन झाल्याचा मोठा फटका सहकारी संघांना बसत आहे. राज्यातील सर्वात मोठय़ा गोकुळ दूध संघालाही आर्थिक झळ  बसली आहे. शासनाने लागू केलेला दुधाचा दर देणे सहकारी संघावर बंधनकारक असते. खासगी व्यापाऱ्यांना असे बंधन नाही. त्यामुळे ते कमी दराने दुधाची खरेदी करतात. येथे पहिला फटका सहकारी संघाना बसतो. शिवाय, खासगी व्यापारी गरजेइतके दूध खरेदी करतात, पण सहकारी संघाना सभासदांचे सर्व दूध खरेदी करणे भाग आहे. ज्यादा पैसे मोजून दूध खरेदी करणे, ज्यादा दूध झाल्याने त्यावर भुकटीची प्रक्रिया करणे, यामुळे सहकारी संघाचा तोटा वाढत आहे. गोकुळकडे पाच हजार टन भुकटीचा आणि ३५०० टन लोणी साठा असून त्याची किंमत २५० कोटी रुपये आहे. भुकटी बनवण्यासाठी प्रति किलो २४० रुपये खर्च येतो, पण विक्री मात्र १४० रुपये दराने होत असल्याने किलोमागे १०० रुपये नुकसान सोसावे लागत आहे, असे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

शासनाने जबाबदारी घ्यावी – अरुण नरके

दुधाच्या भुकटीच्या रूपाने दुग्ध व्यवसायावर संकट येणार असल्याची पूर्वसूचना अडीच वर्षांपूर्वी दिली होती, असे इंडियन डेअरी असोशिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितले. त्या ते ना दूध संघाने मनावर घेतले ना शासनाने. कोणीच फारसे गंभीरपणे घेतले नसल्याने आता त्याची उग्रता भेडसावू लागली आहे. परिस्थितीचे चटके बसायला लागले आहेत. लाखो गरीब शेतकरी या शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहेत. तो तोटय़ात चालल्याने त्यांना  सरकारकडून मदत करण्याची गरज आहे. भुकटी निर्यातीसाठी भरीव अनुदान, भुकटीचा बफर स्टॉक, फायदा राहो पण किमान उत्पादन खर्चात खासगी व सहकारी संस्थांची भुकटी खरेदी, शालेय पोषण आहारात भुकटीचा समावेश आदी उपाय तातडीने लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विदेशात एक तर शेतकऱ्याकडे हजारी जनावरे असतात, त्यामुळे त्याला मंदी – नुकसान सहन करता येते, दुसरे म्हणजे तेथे शासन अडचणीतील शेतकऱ्याला लगेच मदत करण्यास तत्पर असते. त्यामुळे विदेशातील शासनाप्रमाणे केंद्र शासनाने मदतीचा हात सत्वर द्यवा, अशी मागणी त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:40 am

Web Title: dairy business face trouble around the world
Next Stories
1 दैव देतं आणि कर्म नेतं ! नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेताना अटक  
2 लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापुरात उमेदवारांची शोधाशोध !
3 इंधन दरवाढीविरोधात कोल्हापुरात शिवसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रवादीचा मोर्चा
Just Now!
X