09 August 2020

News Flash

पश्चिम विदर्भातील दुग्धव्यवसाय संकटात

घरात चारा नसल्यामुळे अनेक पशुपालकांचा दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे

(संग्रहित छायाचित्र)

मोहन अटाळकर, अमरावती

यंदा परतीच्या पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ घालून खरीप पिकासह चारा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान केले. त्यामुळे चारा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच गेल्या एक महिन्यात कुटार, चाऱ्यासह ढेपीचे भाव वाढल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातच पशुपालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दूध उत्पादनात सातत्याने घट होत असतानाच यंदा ओल्या दुष्काळाने त्यात कहर केला आहे.

घरात चारा नसल्यामुळे अनेक पशुपालकांचा दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी पशुपालकांना चाऱ्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सन २०१२ च्या पशुगणनेनुसार अमरावती विभागात दुभत्या गाईंची संख्या २ लाख ४४ हजार ६४९ तर म्हशींची संख्या १ लाख ७७ हजार ७९५ इतकी आहे. एकूण ४ लाख २२ हजार पशुधनापासून सद्य:स्थितीत सुमारे २० लाख ४७ हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. पण गेल्या पाच वर्षांमध्ये पशुधन सुमारे ३० टक्क्यांनी घटले आहे. दुष्काळ, चाराटंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष आणि इतर कारणांमुळे पशुधनात घट झाल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे मत आहे. १९ व्या पशुगणनेत अमरावती विभागात ३ लाख ४९ हजार दुभत्या गाईंची नोंद करण्यात आली होती. दुग्धोत्पादनात गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ८ लाख ७७ हजार लिटरने घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी २९ लाख २५ हजार लिटरचे उत्पादन होत होते, ते आता २० लाख ४७ हजार लिटपर्यंत खाली आले आहे.

जनावरांसाठी सुमारे ४० लाख २५ हजार मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. यंदा विभागात पुरेशा पावसामुळे चाऱ्याचे उत्पादन मुबलक होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. परंतु गेल्या ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत परतीच्या पावसाने सतत पंधरा दिवस हजेरी लावून शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण केले. चारा उत्पादनासाठी महत्वपूर्ण सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद व मका या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे घरातील कुटार व शेतातील चारा नष्ट झाला आहे.

पावसामुळे घरातील कुटार सडले असून त्यामुळे जनावरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कुटारासाठी पशुपालकांना भटकंती करावी लागत आहे. कुटार मिळाले तरी त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यातच ढेपीचे भाव गगनाला भिडल्यामुळे त्याचा फटका दुग्धव्यवसायाला बसत आहे.

सद्यस्थितीत मका पिकाचे कुटार अडीच ते तीन हजार रूपये ट्रॉली, सोयाबीनचे दोन हजार रुपये ट्रॉली, ज्वारीच्या एका ट्रॉलीच्या कुटारासाठी पशू मालकांना तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. ढेपीचे दरही वाढले आहेत. एकूणच दूध उत्पादनाचा खर्च, मिळणारे दूध आणि त्याचा खरेदी दर याचा मेळ बसत नसल्याने अडचण वाढली आहे.

राज्यात तीन पद्धतीतून दूध खरेदी केली जाते. शासन स्तरावर गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर २५ रुपये आणि म्हशीच्या दुधाचा ३४ रुपये आहे. खासगी संघाचे दर २८ ते ३० रुपयांपर्यंत आहेत. दूधाची तूट लक्षात घेता दर वाढविण्याची आवश्यकता असताना दुधाचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत. सहकारी पातळीवरील व्यवस्था तर मोडकळीस आली आहे.

अमरावती विभागातील १७४९ सहकारी दुग्ध संस्था अवसायनात निघाल्या असून १०७ प्राथमिक संस्था बंद अवस्थेत आहेत. अमरावती विभागात  केवळ १२१ प्राथमिक संस्था कार्यरत आहेत. सहकार विभागाकडे नोंदणीकृत प्राथमिक सहकारी दुग्ध संस्थेचे ऑडिट न करणे, नियमानुसार दर पाच वर्षांला संस्थेच्या निवडणुका न घेणे, सहकार कायदा १९६० नियम १९६१ नुसार तरतुदीचे पालन न करणे, नियमित दूधसंकलन न करणे, संस्थेचे नियमित नोंदी न ठेवणे आदी बाबींमुळे सहायक निबंधकांनी या संस्था अवसायनात काढल्या आहेत. अनेक संस्थांवर नियमानुसार अवसायकाची निवडसुद्धा करण्यात आली आहे. मात्र, सदर संस्था, पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झालेले नाहीत.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दूध उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकरी आणि पशुपालकांना शाश्वत रोजगार मिळावा, यासाठी शासकीय दूध यंत्रणा उभारली गेली, दूध डेअरीचे जाळे विणले गेले. पंतप्रधान पॅकेजमधूनही या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी विशेष तरतूद करण्यात आली, तथापि उत्पादन घसरल्याने शासकीय दुग्धव्यवसायही संकटात सापडला आहे.

जनावरे सांभाळणे कठीण

दूधव्यवसाय विविध कारणांमुळे अडचणीत आला आहे. त्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि यंदा ओल्या दुष्काळाने या व्यवसायाचे अर्थकारण बिघडवून टाकले आहे. अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला उभारी मिळू शकली नाही. दूधसंकलन कमी होत चालले आहे. यात दुभत्या जनावरांच्या पोषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. ओल्या आणि सुक्या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे वाढते दर इत्यादी अडचणींमुळे दुभती जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:03 am

Web Title: dairy farming face crisis in west vidarbha zws 70
Next Stories
1 दिवसा वेग आटोक्यात
2 विरार-डहाणू रोड चौपदरीकरणाची रखडपट्टी
3 आमदारांना नवीन सरकारच्या आदेशाचा फटका बसणार
Just Now!
X