लोकांच्या घटलेल्या पाठिंब्यामुळे चिंतेत असलेल्या नक्षलवाद्यांनी आता संघटनात्मक पातळीवर फेरबदल सुरू केले असून आजवर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले आहे. या समितीत प्रथमच दलित समाजाला प्रतिनिधित्व देऊन नक्षलवाद्यांनी भविष्यातील वाटचालीचे संकेत दिले आहेत.
मध्य भारतात गेल्या अनेक दशकांपासून सक्रीय असलेल्या नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचारात गेल्या दोन वर्षांत कमालीची घट झाली आहे. या काळात किशनजीसारखे अनेक नक्षलवादी मारले गेले. शिवाय, सुरक्षा दलांच्या प्रभावी कामगिरीमुळे या चळवळीच्या जनाधारातसुद्धा घट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर चळवळीत पुन्हा चैतन्य आणण्यासाठी नक्षलवाद्यांनी केंद्रीय समितीत मोठे फेरबदल करायला सुरुवात केली आहे. पॉलिट ब्युरोनंतर ही समिती सर्वोच्च मानली जाते. सध्या या समितीत १७ सदस्य आहेत. या समितीत आजवर महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेला सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. मिलिंद जंगलात दीपक या नावाने ओळखला जातो. आजवर भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम करणाऱ्या व मूळचा वणीचा असलेल्या तेलतुंबडेच्या रूपाने प्रथमच या समितीत दलित समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा सचिव म्हणून काम पाहणाऱ्या मिलिंद तेलतुंबडेवर उत्तर गडचिरोली, गोंदिया व बालाघाट या विभागाची सुद्धा जबाबदारी होती. आता या विभागाची जबाबदारी विकास नागपुरेवर सोपवण्यात आली आहे. मूळचा मुंबईचा असलेला विकास नागपुरे विद्यार्थी दशेपासून या चळवळीत सक्रीय झाला. नागपूरच्या धनवटे महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विकासने १३ वर्षांपूर्वी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. सध्या तो जंगलात बाबुराव तोफा या नावाने वावरतो. जंगली भागातील जनाधार घटत चालल्याने नक्षलवाद्यांना नवे मनुष्यबळ मिळेनासे झाले आहे. त्यामुळे आता आदिवासी समाजासोबतच दलितांना जवळ करण्याचा प्रयत्न या चळवळीकडून सुरू झाला आहे. यासाठीच या चळवळीने शहरी भागावर लक्ष केंद्रित केले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून मिलिंद तेलतुंबडेला केंद्रीय समितीवर घेण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. मिलिंद तेलतुंबडेच्या या निवडीला नुकताच आंध्रप्रदेशात शरण आलेल्या गुडसा उसेंडीने सुद्धा दुजोरा दिला असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.