अहमदनगर जिल्ह्य़ातील जवखेडे खालसा (तालुका पाथर्डी) येथील सध्या बहुचर्चित असलेल्या दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी भारतीय बहुजन पँथरचे नेते रतनकुमार पंडागळे व चित्रपट दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे यांनी केली.
जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) व सुनील संजय जाधव (१९) या तिघांची जातीय वादातून अत्यंत क्रूर हत्या झाल्याचे पंडागळे यांनी पत्रकात म्हटले आहे. ज्या प्रकारे हत्या झाली ते चित्र भेसूर, अमानुष, क्रौर्याचे  प्रतीक होते. शरीराचे तुकडे-तुकडे करून बोअरवेलच्या नळकांडात टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यातून अवयव जात नाहीत, असे लक्षात आल्यानंतर हे अवयव दूरवर विहिरीत टाकण्यात आले. नगर जिल्ह्य़ातील दलित समाज भयभीत अवस्थेत आहे. आरोपींना आश्रय देणाऱ्यांचा शोध घेऊन आरोपींसह त्यांनाही फाशी द्यावी. या घटनेचा तपास तातडीने करून आरोपींना जेरबंद न केल्यास भारतीय बहुजन पँथरच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंडागळे यांनी दिला. डॉ. म्हात्रे, अॅड. अमोल वाकेकर, यादवराव शेजूळ आदी जाधव कुटुंबीयांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.