शहरी भागात चळवळीला आधार मिळावा म्हणून दलितांना प्रयत्नपूर्वक जवळ करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत एका दलित उपसरपंचाची हत्या केल्याने दलित संघटनांना धक्का बसला आहे. या संघटना आता मौन का बाळगून आहेत, असा सवाल ‘भूमकाल’ या संघटनेने केला आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रशासन विरुद्ध नक्षलवादी असा सामना रंगला आहे. या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. जनतेत दहशत निर्माण व्हावी म्हणून नक्षलवाद्यांनी गेल्या १९ एप्रिलच्या मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दामरंचा गावात पत्रू दुर्गे या ५० वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली. पत्रू दुर्गे अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रीय होते. गेल्या पाच वर्षांपासून ते दामरंचा ग्रामपंचायतीचेउपसरपंच होते. यावेळी गावात निवडणूक नव्हती तरी त्यांनी  उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यावरून नक्षलवाद्यांनी दुर्गे यांना ठार मारले.
‘पत्रू दुर्गे हे पोलिसांचे खबरे’
विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांनी ही हत्या करताना पत्रू दुर्गे हे पोलिसांचे खबरे होते, असे पत्रक त्यांच्या मृतदेहाजवळ ठेवले होते. ‘भूमकाल’ने या हत्येचा निषेध केल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा एक पत्रक प्रसिद्धीला देऊन पत्रू दुगॅे हे सरकारी कामात पुढाकार घेत होते. उपसा सिंचन योजनेसाठी त्यांनी प्रयत्न चालवले होते. वनखात्याचे कार्यालय गावात सुरू व्हावे, यासाठी ते प्रयत्नरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, असे म्हटले आहे. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी दुर्गे यांचा आमच्याशी काहीही संबंध नव्हता. ते लोकप्रतिनिधी व सक्रीय कार्यकर्ते होते, असे म्हटले आहे.