News Flash

धरण असूनही उसनवारी

उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक व नागरीकरणामुळे मुंबईचे सर्वात जवळचे उपनगर होण्याच्या मार्गावर आहे.

|| जगदीश तांडेल

उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक व नागरीकरणामुळे मुंबईचे सर्वात जवळचे उपनगर होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी उरणमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(एमआयडीसीचे) पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या मागील धरणाची ४५ वर्षांत क्षमता घटल्याने २८०० मिलीमीटर पाऊस होऊन तीन महिन्यांच्या पाण्यासाठी उरणकरांना सिडकोकडे उसनवारी करावी लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे २००६ पासून एमआयडीसीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे धरणाच्या उंचीचा प्रलंबित असलेला प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास उरणच्या संपूर्ण पाण्याचा प्रश्न सुटेलच शिवाय जादा पाणी शिल्लक राहील. असे असताना केवळ नियोजनशून्यतेची टंचाई असल्याने येथील नागरिकांना तीन ते चार महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच याचा फटका बसल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ही समस्या सुटावी व धरणाची उंची वाढवून उरणला पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्याची मागणी सध्या येथील नागरिक करू लागले आहेत. त्याची वचने अनेक निवडणुकांत देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

औद्योगिक आणि नागरीकरण अशा दोन भागांत उरण तालुक्याचा विकास होत आहे. उरणचा भाग खाडीकिनारी असल्याने पाणी टंचाईही येथील नेहमीचीच समस्या राहिली आहे. असे असले तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून गाव तळ्यांचे सरंक्षण करीत त्यावर मात केली जात होती. तर विविध योजनांतून पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर उन्हाळ्यातील आठ महिन्यांत केला जात होता. मात्र नागरीकरणाच्या ओघात हे सर्व नैसर्गिक स्रोत नष्ट झाल्याने केवळ धरणाच्या नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठय़ावरच आल्याने नागरी व औद्योगिकीकरणात जसजशी वाढ झाली तशी टंचाई भासू लागली आहे. उरण तालुक्यातील २५ ग्रामपंचायती, उरण नगरपालिका तसेच येथील औद्योगिक विभागासाठी केला जाणारा पाणीपुरवठा यासाठी १९६० च्या दरम्यान रानसई धरण बांधण्यात आलेले होते. ज्या वेळी हे धरण बांधण्यात आले त्या वेळी त्याची क्षमता १० दशलक्ष घनमीटर इतकी होती. गेल्या ४५ वर्षांत धरणातील गाळ न काढल्याने धरणाची क्षमता घटून ती ७ दशलक्ष घनमीटरवर आली आहे. त्यामुळे उरणमध्ये दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यांपासूनच पाणी टंचाईला सुरुवात होते. तर नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून दिवसाला १० एमएलडी पाणी उसने घ्यावे लागते. यातील निम्मे म्हणजे ५ एमएलडी पाणीच मिळत असल्याने त्याचाही फायदा होताना दिसत नाही.

धरणातील वाढती पाणी टंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीनेच धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या संदर्भात मागील वीस वर्षांपासून नागरिकांकडून मागणी केली जात होती. त्यानंतर तब्बल १२ वर्षे लोटल्यानंतरही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. यात धरणाची उंची वाढल्यानंतर ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रात वन विभागाची काही जमीन येत आहे. त्याला परवानगी मिळालेली नाही. तसेच धरणामुळे विस्थापित होणाऱ्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने हा उंचीचा प्रस्ताव पडून असल्याची कारणे सांगितली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 1:00 am

Web Title: dam midc drinking water akp 94
Next Stories
1 रायगड जिल्ह्यातील सात जागांसाठी ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
2 मला न्याय मिळाला, पण ताईवर अन्याय झाला : चंद्रकांत पाटील
3 आघाडीबाहेरची गट्टी : मनसेने कोथरूडमधील पाठिंबा नाशिकमधून केला परत
Just Now!
X