नीलेश पवार

राज्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्य़ातील नवापूर येथील कुक्कुटपालन व्यवसाय बर्ड फ्लूच्या संकटाने अडचणीत आला आहे. बर्ड फ्लूचा फैलाव आसपासच्या क्षेत्रात होत असून नवापूर शहरापाठोपाठ आता विसरवाडीतील चार कुक्कुटपालन केंद्रांतील पक्षी बाधित झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे सहा लाख पक्षी आणि २६ लाख अंडी यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. नुकसानीची शासकीय आकडेवारी सहा कोटींवर पोहोचली आहे. पुढील काही महिने कुक्कुटपालन केंद्रे बंद राहणार असल्याने या व्यवसायाला कोटय़वधींचा फटका बसणार आहे.

जवळपास दीड दशकापूर्वी नवापूरचा कुक्कुटपालन व्यवसाय बर्ड फ्लूच्या संकटाने उद्ध्वस्त झाला होता. त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या पथकांनी १४ दिवसांत नवापूर परिसरात बाधित झालेल्या २२ आणि बाधित क्षेत्रातील दोन अशा एकूण २४ कुक्कुटपालन केंद्रांतील पाच लाख ९९ हजार २०३ कोंबडय़ांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. तसेच आतापर्यंत २५ लाख ७२ हजार ८८८ अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मंगळवारीही प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने हा आकडा आणखी वाढणार आहे. शासनाकडून एका कोंबडीला ९० रुपये तर अंडय़ाला तीन रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत विल्हेवाट लावलेल्या कोंबडय़ा आणि अंडय़ांचा विचार करता नुकसानीचा आकडा सहा कोटी १६ लाख ४६ हजारांच्या घरात असल्याचे मानले जात आहे.

एखाद्या आपत्तीत यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात ते दिसून येते. बाधित क्षेत्रातील चार कुक्कुटपालन केंद्रांतील कोंबडय़ांचे अहवाल हे सकारात्मक नव्हते. पण प्रशासनाने त्या केंद्रातील कोंबडय़ांची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले. त्याविरोधात व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या केंद्रातील जवळपास ५० हजार कोंबडय़ांची विल्हेवाट लावायची की नाही, ते न्यायालयाच्या निर्णयानंतर निश्चित होईल. मुळातच या सर्व बाधित क्षेत्राबाहेर दोन मोठी कुक्कुटपालन केंद्रे असून सध्या तिथे जवळपास साडेतीन लाखांच्या आसपास कोंबडय़ा आहेत. त्या सुरक्षित क्षेत्रात असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. लगतच्या गुजरात राज्यातदेखील बर्ड फ्लू आढळला असून त्याचा विषाणू हा एच-०५, एन-०१ स्वरूपाचा घातक असल्याने प्रशासन या परिसरात करडी नजर ठेवून आहे.

सहा महिने व्यवसाय ठप्प

बर्ड फ्लूचा शिरकाव होऊन नंदुरबारमधील कुक्कुटपालन व्यवसायाला दुसऱ्यांदा मोठा धक्का बसला आहे. नियमान्वये आता तीन महिन्यांहून अधिक काळ नवीन कोबडय़ांचे संगोपनदेखील कुक्कुटपालन केंद्रचालकांना करता येणार नाही. त्यामुळे नवापूरमधील हा व्यवसाय आणखी सहा महिने तरी ठप्प राहणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.